सोलापूर प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर, दि. ३१ जुलै : सोलापूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्केट यार्डजवळील शेळगी ब्रिज येथे आज पहाटे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे एसटी बस (क्रमांक MH 14 LB 0380) ही प्रवाशांना घेऊन जात असताना समोरून जाणाऱ्या ट्रकला (क्रमांक MH 13 AX 3949) पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या बॅगा आणि साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.
या भीषण अपघातात दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि नागुबाई राम रेवघे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात रामचंद्र प्रभाकर देवघे, विकास प्रकाश पाटील, माणिक नागप्पा वायचळ, रामली लिंग ब्रह्मानंद कापसे, अभिषेक दीपक चव्हाण, अनिकेत सुभाष राठोड, अभिजीत अरुण चव्हाण, नागोराव किसू तोडसांग, अनुराधा अर्जुन चव्हाण आणि तुळसीदास मनोहर पाचंगे हे जखमी झाले असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि आपत्कालीन बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा