Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ जुलै, २०२६

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढे वेतन मिळविण्याचा संकल्प; इंदापूरात उद्या 'विजय मेळावा', हनुमंत ताटे यांच्या ५० वर्षातील योगदानाचा मंत्री दत्तात्रय भरणे व उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार गौरव.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

मंगळवार,२८ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी ( दि.२९ ) रोजी इंदापूरात विजय मेळावा व संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळवून देण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी इंदापूर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे उपस्थित होते.

 शिंदे पुढे म्हणाले, गेल्या काही महिन्यांत संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांवर पाठपुरावा करून मूळ वेतनवाढ, महागाई भत्ता,घरभाडे भत्ता व इतर आर्थिक लाभ मिळवून देण्यात यश मिळविले आहे. मात्र, संघटनेचे अंतिम ध्येय एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचे करणे हेच आहे. त्यासाठी संघटना पुढील टप्प्यात अधिक तीव्र लढा उभारणार आहे.

संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे म्हणाले, एस. टी. महामंडळाच्या आर्थिक अडचणींसाठी कर्मचारी जबाबदार नाहीत. शासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये. एस.टी.ला राज्याच्या अर्थसंकल्पातून आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा, अशी संघटनेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच दशकांतील कामगार चळवळीचा अनुभव सांगताना एस.टी.च्या विस्ताराची गरज ही अधोरेखित केली. खासगीकरण किंवा कंत्राटी पद्धतीवर भर देण्याऐवजी एस.टी. चा ताफा वाढवून प्रवाशांना अधिक सक्षम सेवा देण्यावर शासनाने भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

इंदापूर डेपोमध्येच आपल्या कामाची सुरुवात झाली. इंदापूरशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे राज्यस्तरीय मेळाव्यासाठी इंदापूरची निवड करण्यात आल्याचे ताटे यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदेशस्तरीय मेळावा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हनुमंत ताटे यांच्या कामगार चळवळीतील ५० वर्षांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. कामगार संघटनेने मिळवलेल्या यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विजय मेळाव्यास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार रवींद्र धंगेकर, आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे नेते प्रदीप गारटकर, नगराध्यक्ष भरत शहा, भाजपचे युवा नेते प्रवीण माने, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे प्रदेशातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा