*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आषाढी एकादशी व आषाढी वारीचे औचित्य साधून धनशैल्य विद्यालय गिरझणी येथे "लिटेरा दिंडी २०२६" चे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रशालेतील शिक्षक वृंद,विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे रोटेरियन बबनराव शेंडगे यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणी पूजनाने करण्यात आली.त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांनी अभंग,भावगीते, भक्तिगीते आणि पारंपरिक नृत्य सादर करत शाळा परिसरातून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढली.विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गोल रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील परंपरा अनुभवत विठ्ठलभक्तीचा आनंद लुटला. तसेच फुगडीसह विविध पारंपरिक खेळ खेळून आषाढी वारीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रसाद तयार करून सर्वांना वाटप केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा,सहकार्याची भावना, भक्ती आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यालय परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.
_______________________________________________







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा