Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

एप्रिलमधील जादूटोणा प्रकरणात प्रा. रामदास झोळ यांच्यासह दोघे सहआरोपी; पोलिसांकडून दोघांना अटक

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


 अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या प्रकरणात एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रा. रामदास झोळ यांच्यासहक्ष आणखी दोघांना सहआरोपी करण्यात आले असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे कुर्डूवाडी परिसरात या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात एप्रिल २०२६ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मनोहर ऊर्फ मामा चंद्रकांत भोसले याच्यासह इतर आरोपींवर कारवाई सुरू आहे. मनोहर मामा भोसले याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर याच गुन्ह्याच्या तपासात प्रा. रामदास झोळ यांच्यासह राजेंद्र गोपाळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांची नावे समोर आली असून, त्यांना याच एप्रिलमधील गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र गोपाळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या माध्यमातून मिळालेल्या कथित पैशांच्या व्यवहाराचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे. तपासादरम्यान आतापर्यंत अनेक आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यापैकी काहींना अटक करण्यात आली आहे.

प्रा. रामदास झोळ यांच्याशी संबंधित संस्थेतील काही कागदपत्रे, रजिस्टर, संगणक व इतर साहित्य पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या साहित्याच्या आधारे पैशांचे व्यवहार आणि या प्रकरणातील इतर संबंधित बाबींची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या मूळ गुन्ह्याच्या तपासातच प्रा. रामदास झोळ यांच्यासह अन्य दोघांची नावे सहआरोपी म्हणून समोर आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा