*सांगली -+प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अवैध अग्निशस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ११ देशी बनावटीची पिस्तुले, २२ जिवंत काडतुसे, दोन स्पेअर मॅगझीन असा एकूण ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयुरेश मनोहर आदाटे (२५), मारुती अशोक गुजले (२४) आणि वैभव ऊर्फ गब्बर संजय इंगळे (२१) यांचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील 'पाजी' नावाचा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने प्रथम मयुरेश आदाटेला नेलकरंजी फाट्यावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती गुजले आणि त्यानंतर वैभव इंगळे यांना अटक करण्यात आली. तिघांकडून एकूण ११ पिस्तुले, २२ काडतुसे आणि दोन स्पेअर मॅगझीन जप्त करण्यात आले.
प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे मध्यप्रदेशातील सेंधवा येथून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. आरोपींकडे कोणताही वैध शस्त्र परवाना नसल्याने त्यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि एलसीबीच्या पथकाने केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा