Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

*वैराग येथे कमकुवत घराची भिंत कोसळून मावशी-भाचीचा दुर्दैवी मृत्यू*

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
वैराग शहरातील खेंदाड गल्ली येथे कमकुवत झालेल्या घराची भिंत कोसळून मावशी-भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. मीनल गुलाब ठोंबरे आणि त्यांची मावशी सुमन महादेव पारदे अशी मृत महिलांची नावे आहेत. या घटनेमुळे वैराग शहरात खळबळ उडाली असून एकाच कुटुंबातील मावशी-भाचीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जे
वैरागजवळील लक्ष्मीचे कुरण परिसरातील जागेवर ठोंबरे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री मीनल गुलाब ठोंबरे आणि त्यांची मावशी सुमन महादेव पारदे या एका खोलीत झोपल्या होत्या. तर दुसऱ्या खोलीत रामा गुलाब ठोंबरे, निशा गुलाब ठोंबरे आणि इयत्ता दुसरीत शिकणारा वीर राम ठोंबरे हे झोपले होते. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कमकुवत झालेल्या घराची भिंत अचानक कोसळली. ही भिंत मीनल ठोंबरे आणि सुमन पारदे झोपलेल्या खोलीवर कोसळल्याने दोघीही विटांच्या ढिगाऱ्याखाली सापडल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी व परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून दोघींनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि वैराग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बार्शीकडे हलविण्यात येत होते. मात्र रुग्णालयात नेत असतानाच वाटेत दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, याच घराच्या दुसऱ्या खोलीत झोपलेले रामा, निशा आणि वीर हे तिघेही सुदैवाने बचावले. भिंत कोसळली असली तरी त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेनंतर वैराग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमूल कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कंगले, शरद कांबळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. ‘इशारा दिला होता; मात्र तीच शेवटची रात्र ठरली’ घटनेनंतर अश्विनी ठोंबरे यांनी सांगितले की, पहाटे साडेपाचच्या सुमारास भिंत कोसळल्याची माहिती मिळताच त्या घटनास्थळी धावत आल्या. त्यावेळी दोघीही विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दिसल्या. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले. घराची अवस्था कमकुवत असल्याने सासू आणि त्यांच्या मावशीला त्या घरात झोपू नका, अशी सूचना यापूर्वीच केली होती. मात्र ‘असू दे’ असे म्हणत त्या दोघी त्याच खोलीत झोपल्या. अखेर ती रात्रच त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली, अशी हळहळ अश्विनी ठोंबरे यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा