*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्यासाठी सुरू करण्यात आलेली ई - टेंडर प्रक्रिया अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी धरण परिसरातील पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
उजनी धरण परिसरातील ५७ गावे व वाड्या वस्त्यावरील हजारो मच्छीमार कुटुंबांचा मासेमारी व्यवसाय उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. खासगी ठेकेदारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने इंदापूर तालुक्यातील मच्छीमार संघटना, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती तसेच उजनी मच्छीमार बचाव अभियानाने खासगी मासेमारी ठेका प्रक्रियेला विरोध केला होता. याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मच्छीमारांनी गाव, तालुका तसेच जिल्हा स्तरावर खाजगी ठेकेदारी निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन केले होते. जलसंपदा विभागाचे पुणे येथील अधिकारी हनुमंत धुमाळ यांच्या कार्यालयात महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत तीव्र निषेध केला होता. यावेळी हनुमंत धुमाळ यांनी योग्य कार्यवाही करू असे आश्वासन आंदोलकांना दिले होते.
मच्छीमारांच्या मागणीची दखल घेत कृषीमंत्री भरणे यांनी उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका प्रक्रियेला स्थगिती देऊन ती रद्द करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. दरम्यान, मच्छीमार संघटनांनी मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलनाचा इशारा दिला होता. यापूर्वी सिंचन भवन येथे आंदोलन तसेच उजनी तलावात जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर मच्छीमारांच्या उपजीविकेचा आणि पारंपरिक व्यवसायाच्या भवितव्याचा विचार करून संबंधितांची बैठक घेण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार संजय शिंदे, प्रधान सचिव एकनाथ डवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. चोपडे, जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मच्छीमार समाजाच्या वतीने उज्वला परदेशी, संजय दरदरे, चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, अनिल नगरे, सिताराम नगरे, नंदकुमार नगरे, लक्ष्मण शिर्के, नितीन ईरीचे, युवराज नगरे, नवनाथ परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यासह उजनी धरण परिसरातील पारंपरिक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयासाठी मच्छीमार बांधवांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी इंदापूर शहरानजीक सरकारी मळा येथे आधुनिक मत्स्य महाविद्यालय उभारणीचे स्वप्न पाहिले होते, त्याचा पाठपुरावा सुरू केला होता मात्र त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे पाठपुरावा करावा, मत्स्य प्रकिया उद्योग उभा करावेत असे मत मत्स्य व्यावसायिक यांच्याकडून व्यक्त होत आहे.
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-टेंडर प्रक्रिया रद्द, हजारो मच्छीमारांना दिलासा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यास यश.
उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-टेंडर प्रक्रिया रद्द, हजारो मच्छीमारांना दिलासा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यास यश.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा