Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

भाद्रपदी अमावास्येला शेतकरी राजा बैलपोळा सण साजरा करतात. त्यानिमित्त बाजार पेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्याची दुकाने थाटली आहेत. परंतू दुष्काळाच्या सावटामुळे खरेदीसाठी कोणी फिरकत नसल्याचे चित्र

*कार्यकारी संपादक* *एस. बी. तांबोळी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-8378081147*
-----: भाद्रपद मासातील अमावास्येच्या दिवशी जिल्ह्यात शेतकरी राजा सर्जा राजाचा बैलपोळा सण साजरा करतात. त्यानिमित्त परिसरातील बाजार पेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्याची दुकाने थाटली आहेत. दुष्काळाच्या सावटामुळे खरेदीसाठी कोणी फिरकत नसल्याचे चित्र आहे. यात्रिकीकरणाच्या जमान्यात बैलांची संख्या कमी झाल्याने पूजेसाठी मातीचे बैल घेण्याकडेही कल वाढला आहे. तर दुधाचे दर जेमतेम वाढल्याने गाय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी राजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सर्वच मालाचे दर स्थिर व माफक ठेवल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असे व्यापारी नीलेश चिखले यांनी सांगितले. बैलपोळ्यासाठी सुताचे तयार माल वेसण, म्होरकी, पितळी साखळ्या, बेगड, पायांतील तोडे, पट्ट्या याप्रकारचा तयार माल सध्याला सहजरीत्या उपलब्ध होत आहे. पूर्वी मात्र अशा प्रकारचा माल मजुरांकडून हजेरीत तयार करून घ्यावा लागत होता. परिसरातील अकलूज, नीरा नरसिंहपूर, टेंभुर्णी, पिंपरी बुद्रुक, बावडा, रेडणी, इंदापूर आठवडे बाजारावर दुष्काळाचे मोठे सावट दिसून येत आहे. त्यामुळे खरेदीसाठी अद्याप कोणीही फिरकतही नाही. त्यामुळे बाजारपेठेत बैल पोळ्याच्या सणावर आर्थिक मंदिचे सावट स्पष्टपणे दिसू लागले आहे. बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे दर मागील वर्षी पेक्षा प्लास्टिकचे दर उतरल्याने कमी झाल्याचे व्यापारी निलेश चिखले यांनी सांगितले. त्यामध्ये बैलाच्या अंगावरील झूल १४०० ते ३२०० रुपये, बाशिंगे १८० ते २९०, घुंगरमाळ २०० ते २५०, पायांतील चाळ १०० ते २००, दृष्टीच्या माळा ७० ते १००, शिंवा १६० ते ५५०, कवड्यांच्या माळा ७० ते १८० रुपये, सुताची दोरी १५० ते ३०० काळा व रंगीत गोप २०० ते २५०, गळ्यातील बेल्ट १०० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. सुताचे प्रमाण वाढून तयार मालाला बाजारपेठेत मागणी वाढल्याने तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात बैलजोड्या जाऊन त्याची जागा ट्रॅक्टरने घेतल्याची दिसत आहे. त्यामुळे बैलपोळा साजरा करणे नुसती औपचारिकता राहिल्याचे केशव बोडके, राहुल बागल, नंदकुमार शिंदे यांनी सांगितले. तर जुन्या रूढी परंपरा ग्रामीण भागात अद्यापही जिवंत असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात बैलजोड्या व गावरान गाई दिसत असल्याचे रणधीर मोहिते, विक्रम मोहिते, मुकूंद कांबळे, संतोष सूतार यांनी सांगितले. फोटो - टणू येथे बैलपोळा सणाच्या साहित्याच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट दिसत आहे. --------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा