*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून ४५ वर्ष फक्त त्यांच्याच भल्यासाठी अविरतपणे कार्य करणारे आमचे मार्गदर्शक करमाळा तालुक्यातील वादळी व्यक्तिमत्व माननीय आनंद कोठडीया सर वय ७९ यांचे आज त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा ॲड प्रितम, एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. करमाळा तालुक्यातील कृषी विकासाच्या क्षेत्रामध्ये त्यांचे भरीव योगदान होते . महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा कृषी विभागातील सर्वोच्च कृषिरत्न व कृषीभूषण या दोन्ही पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सुखवस्तू कुटुंबात जन्म होऊनही कायम वंचित शोषित वर्गातचे दुःख कमी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सरांवर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ,प्राचार्य नरहर कुरुंदकर ,कॉम्रेड शरद पाटील ,प्रा .आ .ह.साळुंखे , डॉ.रावसाहेब कसबे यांच्या विचारांचा प्रभाव पडल्याने नोकरी किंवा व्यवसाय न करता पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला.डॉ.कुमार सप्तर्षी ,डॉ.बाबा आढाव यांच्याकडून जन आंदोलनाची प्रेरणा घेत करमाळा तालुक्यासारख्या मागासलेल्या भागात सामाजिक कार्य केले. कसलीही सरकारी मदत न घेता लोकविकास संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन सुरू केलेल्या कार्यात शेती व शिक्षण ,पुनर्वसन, पाणलोट विकास ,वीज पुरवठा, ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये भरीव काम केले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले रोजगार हमी, पुनर्वसन, कृषी विस्तार यामध्ये मोठे काम उभे राहिले. पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्या सहयोग व प्रेरणेतून तीस वर्षांपूर्वी ठिबक सिंचन व पाणलोट क्षेत्रातही भरिव कार्य झाले. चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या कामाचे सकारात्मक परिणाम आज दिसत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक कार्यकर्ते तयार झाले. आज त्यांचे वय झाले तरीही तितक्याच ताकदीने मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. संपुर्ण देशातच नाही तर परदेशातही त्यांचे मित्र उच्चस्पद अधिकारी, लेखक, विचारवंत, उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, राजकारणी, व विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींशी त्यांचे सुलोख्याचे प्रेमाचे संबंध आहेत. आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांची सर्वात मोठी कमाई जर कोणती असेल तर त्यांनी कमावलेला हा प्रचंड मोठा गोतावळा. आयुष्यभर निस्वार्थीपणे कार्य करून कोणाचाही मिंदेपणा स्वीकारला नाही. तत्वांशी तडजोडी केल्या नाहीत. सामान्य शेतमजूर शेतकरी असो अथवा राज्याचा मुख्यमंत्री असो त्याच्याशी त्यांचे बोलणे एकसारखेच असते हे त्यांचे खास वैशिष्ट्य कायम जाणवले. . चांगल्या केलेल्या कामाचे कौतुक तोंड भरून करत असताना चुकीच्या कार्यावर परखडपणे व्यक्त होणे या गुणांचा परिणाम अनेकवेळा त्यांचे काही लोकांशी संबंध बिघडण्यात झाला पण याची त्यांनी कधी तमा बाळगली नाही. आपल्याला जे वाटते ते स्पष्टपणे बोलणे हा त्यांचा स्वभाव कायम होती.तसेच प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला काही अडचण आली तर त्याच्या पाठीशी राहून ती दूर करण्यासाठी आधारवड म्हणून असलेली भुमिकाही ठाम होती ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगणे सहज शक्य असताना ते लाथाडून आयुष्यभर प्रामाणिकपणे लोकसेवेचे, लोकविकासाचे व्रत घेऊनd तटस्थपणे एक व्रतस्थ जीवन जगणाऱ्या अशा या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली
.......गजेंद्र पोळ शेटफळ ( ना)
ता करमाळा जि सोलापूर
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६
करमाळा तालुक्यातील वादळी व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांचा आधारवड हरपला..
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा