*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
*तामलवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) दि. २९ -* तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी ग्रामपंचायतीने स्व-उत्पन्नातील ५% दिव्यांग कल्याणकारी निधी गेल्या दोन वर्षांपासून खर्च न केल्यामुळे माजी सैनिक व आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने दिव्यांग निधी वाटपाचा निर्णय घेतला असून या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
या संदर्भात दैनिक लोकमत, एकमत, टाइम्स ४५ न्यूज आणि इतर वृत्तपत्रांमध्ये "दिव्यांग निधी रखडल्याने माजी सैनिकाचे ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू" अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ आणि ग्रामपंचायत लेखसंहिता २०१४ नुसार ग्रामपंचायतीला ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.
प्रशासनाने श्री सावंत यांना दिलेल्या माहितीनुसार, तामलवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकूण ६१ दिव्यांग लाभधारकांनी कागदपत्रे सादर केली होती. त्यापैकी ४४ जणांची कागदपत्रे वैध आढळून आली आहेत. तर १७ लाभधारकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या असून त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास ते लाभार्थी पुढील वर्षाकरिता पात्र ठरणार आहेत.
ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे यांनी सांगितले की, "ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सही नमुन्याची कार्यवाही पूर्ण करून घेतली असून पुढील ०३ (तीन) दिवसांत दिव्यांगांच्या निधीचा योग्य विनियोग केला जाईल आणि हा निधी दीपावलीपूर्वी वाटप करण्यात येईल." याबाबत श्री सावंत यांनी दिव्यागाची दिपावली सण या दुष्काळग्रस्त परिस्थित साजरा करण्यास परिस्थितीचा साजेशी नसली तरी, फूल नाही परंतु फुलाची पाकळी एवढे प्रमाणात प्रामाणिक प्रयत्न ग्रामसेवक व प्रशासक यांनी केल्याबद्दल व तामलवाडी येथील सर्व मित्रांना व ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी या आंदोलनादरम्यान प्रोत्साहन व पाठिंबा दिला त्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त केले व त्या सर्वांमुळेच हे आंदोलन यशस्वी झाले असे श्री सावंत म्हणाले.
दरम्यान, माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांच्या या लढ्यामुळे तामलवाडीमधील सर्व दिव्यांग बांधवांनी व भगिनीने आनंद व्यक्त केला आहे व त्यांचा हक्काचा निधी मिळण्याची आशा पल्लवित झाली असून त्यांची दीपावली गोड होत आहे याचे सर्व स्तरातून श्री सावंत यांच्या आंदोलनाचे स्वागत होत आहे.
*फोटो ओळ :* तामलवाडी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करताना माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण व इतर (फाईल फोटो)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा