Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

दुष्काळी परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, दुष्काळात राजकारण नाही : खासदार सुप्रिया सुळे.

*इंदापूर, डॉ. संदेश शहा*. *टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील रेडणी, निरवांगी परिसरातील शेतकऱ्यांच्या करपलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी, कर्जमाफी द्यावी, टँकरने पाणीपुरवठा करावा तसेच पशुधन जगविण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करावा आदी मागण्या यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केल्या. नीरा भीमा नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या, उजनी धरणाचे प्रचंड पाणलोट क्षेत्र असलेल्या इंदापूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने तसेच परतीचा पाऊस न पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनासमोरील प्रश्न गंभीर बनले आहेत. त्याची दखल घेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेडणी व निरवांगी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसा अभावी शेतीचे झालेले नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न जाणून घेतला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांतील पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, सरकारने नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया वेळ न दवडता पूर्ण करावी आणि शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी बाबतही सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करा; चारा छावण्यांचे नियोजन करा! दुष्काळी परिस्थितीचा परिणाम ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही होत आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तेथे प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जनावरे ही महत्त्वाची संपत्ती असल्याने त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यामुळे गरज असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही सुळे यांनी केली. ‘राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकार्य करू’ शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. “राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत,” असे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाही, तर पुढील वर्षभराचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पंचनामे, आर्थिक मदत, पाणीपुरवठा आणि चारा व्यवस्थापन याबाबत प्रशासनाकडून प्रभावी कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शहराध्यक्ष ऍड. इनायतअली काझी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, सागर मिसाळ, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, महावीर शहा, अमोल मुळे यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा