पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
पुणे कात्रज दत्तनगर येथील आनंद दरबारमध्ये रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सद्भावना समारोह व संघ गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्रमण संघीय सल्लागार पूज्य श्री रमणिकमुनीजी म. सा., राष्ट्रसंत पूज्य श्री नरेशमुनीजी म. सा., महासतीजी पूज्य श्री जयश्रीजी म. सा., महासतीजी पूज्य श्री सौरभसुधाजी म.सा. आणि महासतीजी पूज्य श्री हिमानीजी म.सा. आदी गुरु भगवंतांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा पार पडला. हा सोहळा सर्वांना आध्यात्मिक पर्वणी ठरला. आनंद दरबाराचे अध्यक्ष श्री बाळासाहेब धोका यांच्या पुढाकाराने तसेच सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा दिव्य कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना पूज्य रमणिकमुनीजी महाराज म्हणाले, "सद्भावना समारोह हा विविधता, एकता आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे. जैन धर्मातील अनेक साधुसंतांचे एकाच धर्मसभेत एकत्रित दर्शन होणे हा ऐतिहासिक आणि दुर्मिळ योग आहे. अशा पवित्र प्रसंगी उपस्थित राहून गुरु भगवंतांचे दर्शन घेणारे भाविक खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत.
यावेळी राष्ट्रसंत पूज्य नरेशमुनीजी महाराज यांनी पुणेकरांना आवाहन करताना सांगितले की, पुण्यामध्ये श्रमण संघाच्या ज्येष्ठ व वयोवृद्ध साधुसंतांसाठी कायमस्वरूपी निवासस्थानाची व्यवस्था उभारण्यात यावी. साधुसंतांच्या सेवेसाठी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
या सोहळ्यास विजयराज भंडारी, विजयकांत कोठारी, मनोज छाजेड,लकीचंदजी खिंवसरा, युवा नेते अक्षय जैन, पृथ्वीराज धोका, पन्नालालजी पितळलिया, अशोक सालेचा, प्रकाश बोरा, अशोक पगारिया, नितीन मुथ्था आदी मान्यवरांसह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते 'संघ गौरव पुरस्कार' प्रदान करून समाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री नीलेशजी सुंदेचा मुथा, श्री गणेशजी ओसवाल, श्री विजयजी धोका, श्री महेशजी फिरोदिया आणि श्री विजयजी लुणिया यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थित मान्यवर, गुरु भगवंत आणि भाविकांचे आभार मानले. तसेच आनंद दरबारच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. याचबरोबर या प्रांगणात शिक्षणाचे बीज रुजविण्याच्या उद्देशाने 'आनंद कल्पतरू प्रायमरी स्कूल' या शैक्षणिक संस्थेची घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघ, दत्तनगरचे सर्व ट्रस्टी मंडळ आणि आनंद दर्शन महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा