Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६

*करमाळा शहर व परिसरात अवैद्य सावकारकीचा सुळसुळाट-सर्वसामान्य नागरिक भयभीत- पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष*

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवाजवी व्याजदर, पैशांच्या वसुलीसाठी दबाव आणि दहशतीच्या वातावरणामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, सावकारांच्या भीतीपोटी अनेकजण तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र असल्याचे बोलले जात आहे.

पोटेगाव परिसरातील एका प्रतिष्ठित नागरिकाने नुकताच करमाळा पोलीस स्टेशनमध्ये एका सावकाराविरोधात तक्रार अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, तक्रार दाखल करण्यापूर्वी संबंधित नागरिकाने अनेकदा विचारविनिमय केला. तक्रार केल्यानंतर आपल्यावर किंवा कुटुंबावर काही परिणाम होईल का, अशी भीती त्यांच्या मनात असल्याचे समजते.

सावकारीच्या व्यवहारातून काही ठिकाणी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आर्थिक अडचणीमुळे व्याजाने पैसे घेतल्यानंतर वाढत्या व्याजाचा बोजा, वसुलीसाठी होणारा दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागण्याच्या भीतीमुळे अनेकजण आपली व्यथा उघडपणे मांडत नाहीत.

विशेषतः दुष्काळी परिस्थिती, शेतीतील नुकसान आणि आर्थिक संकटामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत अवैध सावकारीचा विळखा अधिक गंभीर ठरू शकतो.

पोटेगावसह करमाळा तालुक्यातील इतर ग्रामीण भागांमध्येही अशा प्रकारांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अवैध सावकारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष शोध व तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

करमाळा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अवैध सावकारी, धमकावणे आणि बेकायदेशीर वसुली यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत. तसेच तक्रारदारांना संरक्षण देऊन त्यांचा विश्वास संपादन करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा