*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
: शेतात कष्टाने वाढविलेल्या तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथील उभ्या ऊस पिकात विद्युत तार तुटून लागलेल्या आगीमुळे पाच एकरात असलेला ऊस जळाला असुन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेलगाव वांगी (ता. करमाळा) येथील सचिन ओंबासे, भीमराव केकान, अभिमन्यू केकान यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत खांबावरील तार अचानक तुटल्याने सुमारे पाच एकर क्षेत्रातील गाळपास जाणाऱ्या उभ्या ऊस पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पाणी उपलब्ध करून मोठ्या कष्टाने ऊस पीक जगविण्यात आले होते. मात्र, शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीवरील तार अचानक तुटल्याने ऊस पिकाला आग लागुन मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी कळवताच गावचे तलाठी कांबळे,पोलीस पाटील केकान, वायरमन मुंढे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. जेऊर येथील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना दुसरीकडे विद्युत तार तुटून ऊस पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्युत तार तुटण्याचे नेमके कारण शोधावे व वीज वितरण यंत्रणेतील निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाई देण्याची मागणी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी धर्मराज ओंबासे यांनी महावितरण कडे केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा