Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६

तुळजापूर येथे बेकायदेशीर ले-आऊट व खरेदीखत प्रकरण तापले; आठ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा नगरसेविका प्रगती लोंढे यांच्यासह नागरिकांचे सह दुय्यम निबंधकांना निवेदन; प्रशासकीय दिरंगाईवर गंभीर आरोप

 *तुळजापूर --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9730867448*


तुळजापूर:तुळजापूर येथील सर्वे क्रमांक १३८/१ मधील जमिनीचा बेकायदेशीर विकसन आराखडा (ले-आऊट) सादर करून नोंदणीकृत झालेल्या खरेदीखतांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. प्रगती गोपाळ लोंढे आणि नागरिकांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत या प्रकरणी गुन्हा नोंद न झाल्यास सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा तीव्र इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे


दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी तुळजापूरचे सह दुय्यम निबंधक (श्रेणी-१) यांना हे निवेदन सादर करण्यात आले असून, त्याच्या प्रती माहितीस्तव व कार्यवाहीसाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

तुळजापूर येथील सर्वे क्र. १३८/१ मधील जमिनीचा बेकायदेशीर विकसन आराखडा सादर करून २००८ ते २०२३ या कालावधीत विविध दस्तऐवज व खरेदीखतांची नोंदणी करण्यात आल्याची तक्रार यापूर्वी प्रशासनाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, धाराशिव यांनी नेमलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समितीने (अहवाल दि. २२/०२/२०२६) आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी नेमलेल्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने (अहवाल दि. ०८/०५/२०२५) सखोल चौकशी करून अहवाल सादर केले आहेत.

या चौकशी अहवालांनंतर जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी तसेच स्वतः सह दुय्यम निबंधक कार्यालयानेही (स्मरणपत्र दि. २२/१०/२०२६) या प्रकरणाची दखल घेतली होती.

निवेदनात स्थानिक हरिश्चंद्र देविचंद जगदाळे, पंडित देविचंद जगदाळे (दोघे रा. तुळजाई नगर, तुळजापूर खुर्द), गंगाधर ऊर्फ वसंतराव चंद्रभान चव्हाण (रा. मंगळवार पेठ, तुळजापूर) व इतरांवर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२, ५३ आणि भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ च्या कलम ८२ व ८३ नुसार तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाची इत्थंभूत माहिती आणि समितीचे अहवाल उपलब्ध असूनही आजतागायत आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित आरोपींशी संगनमत करून आणि राजकीय व आर्थिक दबावाला बळी पडून तुळजापूर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद देण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात असल्याचा गंभीर आरोप निवेदकांनी केला आहे.

आठ दिवसांच्या आत दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद न झाल्यास सह दुय्यम निबंधक कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल आणि आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यालयावर राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर नगरसेविका सौ. प्रगती गोपाळ लोंढे यांच्यासह रमेश रंगनाथ कदम, संजय अप्पाराव लोंढे, रितेश अजित लोंढे, पृथ्वीराज मनोज कदम, कृष्णा श्रीकांत साळुंके, प्रसाद संजय मुकेरकर आणि विक्रम विजय कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा