*उमरगा --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उमरग्याची अवघ्या नऊ वर्षांची बालनृत्यांगना स्वरा शीतल चव्हाण हिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नृत्यमंचावर आपल्या कलेची छाप उमटवत उमरग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इंडोनेशियातील बाली येथे दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या ‘इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्हफेस्ट (IIGF) २०२६’ या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत स्वराने उल्लेखनीय कामगिरी करत प्रतिष्ठेचा ‘ग्रँड फायनलिस्ट अवॉर्ड’ (Grand Finalist Award) पटकावला. भारतासह दुबई, मस्कत, अमेरिकेतील फ्लोरिडा, सौदी अरेबिया आदी ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते.
‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणत परीक्षकांकडून कौतुक!
या स्पर्धेतील ग्रँड फिनालेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना दोन वेळा नृत्य सादर करण्याची संधी देण्यात आली होती. स्वराने दोन्ही सादरीकरणांत आपल्या दमदार नृत्यकौशल्यासह विलक्षण आत्मविश्वास, उत्साह आणि ऊर्जेचे दर्शन घडवले. तिच्या दोन्ही सादरीकरणांनी प्रभावित झालेल्या परीक्षकांनी ‘छोटा पॅकेट, बडा धमाका!’ अशा उत्स्फूर्त शब्दांत तिचे विशेष कौतुक केले. अवघ्या नऊव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर दाखवलेला आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण हे स्वराच्या कामगिरीचे विशेष आकर्षण ठरले.
स्पर्धेचे परीक्षक सुशांत पुजारी आणि पल्लवी तोल्ये यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. त्यांच्याच हस्ते विजेत्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्वरालाही त्यांच्या हस्ते ‘ग्रँड फायनलिस्ट अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.
थायलंडमधील रौप्यपदकानंतर बालीतही यशाची मोहोर!
विशेष म्हणजे, गतवर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये थायलंडमधील पटाया येथे झालेल्या १५ व्या ‘कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (COPA)’ या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत स्वराने समूह नृत्यप्रकारात रौप्यपदक पटकावले होते. याच स्पर्धेत तिचे वडील, सामाजिक कार्यकर्ते व विधिज्ञ ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी ‘शिवतांडव’ या एकल नृत्यप्रकारात कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर पिता-कन्येने पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. आता सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवत स्वराने आपल्या कलात्मक वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
यशामागे सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शन!
स्वराच्या या यशस्वी वाटचालीत पुणे येथील फ्लॉलेस डान्स अकॅडमीच्या नृत्यशिक्षिका व नृत्यदिग्दर्शिका भक्ती जाधव-वरखेडे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराने नृत्यकलेतील बारकावे आत्मसात करत आपल्या सादरीकरणात सातत्याने सुधारणा केली आहे. नियमित सराव, कलेविषयीची आवड आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.
सामाजिक कार्याचा वारसा आणि नव्या पिढीची जागतिक भरारी!
स्वराचे वडील ॲड. शीतल चव्हाण यांनी वाचनसंस्कृती, ग्रामीण ग्रंथालय चळवळ, सामाजिक कार्य आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून उमरगा परिसराची ओळख राज्य व देशपातळीवर निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्वतः आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत पदक मिळवल्यानंतर आता त्यांची कन्या स्वरा हीदेखील कलाक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे.
एका छोट्याशा शहरातून थायलंड ते इंडोनेशियापर्यंतचा स्वराचा हा कलात्मक प्रवास ग्रामीण व निमशहरी भागातील गुणवंत मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे उमरगा परिसरात आनंदाचे वातावरण असून, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा