Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२६

मोबाईलच्या दुनियेत पुस्तकांची मैत्री; बादोले प्रशालेत दिवाळी अंक उपक्रमाचे कौतुक

 *वागदरी (अक्कलकोट)-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


बादोले (ता. अक्कलकोट) : शाळेच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि वाचनाची ओढ दिसून आली. के. पी. गायकवाड हायस्कूल, बादोले येथे दरवर्षी राबविण्यात येणारा ‘दिवाळी अंक भेट उपक्रम’ यंदाही उत्साहात पार पडला. यावर्षी विविध मान्यवरांकडून तब्बल ३० दिवाळी अंक प्रशालेस भेट म्हणून प्राप्त झाले आहेत.

पत्रमैत्रीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील साहित्यिक, लेखक, संपादक आणि वाचनप्रेमी मान्यवरांशी जोडलेले नाते या उपक्रमातून अधिक दृढ होत आहे. या मान्यवरांकडून दरवर्षी शाळेला दिवाळी अंक भेट म्हणून पाठविण्यात येतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, साहित्यविश्वाची ओळख व्हावी आणि विविध विषयांवरील ज्ञान समृद्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवशी प्रशालेमध्ये हे दिवाळी अंक विद्यार्थ्यांसाठी वाचनाकरिता ठेवण्यात आले. रंगीबेरंगी मुखपृष्ठे, विविध विषयांवरील साहित्य आणि नव्या अंकांची रेलचेल पाहून विद्यार्थी कुतूहलाने दिवाळी अंक पाहताना व वाचन करताना दिसले. शाळेच्या वातावरणात वाचनाचा आनंद आणि साहित्याची उत्सुकता निर्माण करणारे हे क्षण विशेष लक्षवेधी ठरले.

या उपक्रमासाठी प्रशालेचे कला शिक्षक मयूर दंतकाळे हे सातत्याने प्रयत्नशील असून, महाराष्ट्रभरातील पत्रमैत्रीच्या माध्यमातून दिवाळी अंक मिळविण्यासाठी ते पाठपुरावा करतात. त्यांच्या या वाचनप्रेमी प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी विविध दिवाळी अंक वाचण्याची संधी उपलब्ध होत आहे.

या उपक्रमाचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सोनकर एम. के. सर यांनी कौतुक केले. तसेच संस्थेचे सचिव श्री. माधव कुलकर्णी आणि संस्थाध्यक्ष श्री. मल्लिनाथ बगले यांनीही या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक आणि दिवाळी अंक देऊन वाचनाची गोडी निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा देणारा ठरत आहे.

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शाळेत राबविण्यात येणारे असे उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची एक सुंदर गुंतवणूक होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा