टाइम्स 45 न्यूज मराठी
" गोपाळकाला "जवळ आला आहे. दहीहंडी फोडण्याचा उत्सव हा आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. वर्षानुवर्षे दहीहंडी फोडण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील पोरांनी आपले हात, पाय मोडून घेण्याचे, डोकी फोडून घेण्याचे आणि प्रसंगी जीव गमावण्याचे पराक्रम केलेले आहेत.
यंदा दहीहंडीच्या माध्यमातून संस्कृती टिकवण्याची जबाबदारी नेत्यांच्या पोरांनी घ्यावी.
राज्यातील सर्वात उंच दहीहंडी मुंबईत साजरी करावी. ही दहीहंडी फोडायला राज्यातील सर्व आजी-माजी मंत्री, आजी-माजी आमदार व खासदार यांच्या सुपुत्रांनी गोविंदा व्हावे. एक मजबूत टीम बनवावी. एकही सर्वसामान्य कुटुंबातील पोरगा न घेता सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणात असलेल्या पोरांनी स्वतंत्र दहीहंडी उत्सव समिती बनवावी. राज्यातला सर्वात मोठा मानवी मनोरा उभा करावा.
सर्वसामान्य कुटुंबातील पोरांनी अशा या दहीहंडीला आवर्जून हजेरी लावावी. लांबून 'चिअर्' करावे. सहभागी गोविंदांच्या अंगावर पाणी फेकावे, चुरमुरे, मुरमुरे फेकावेत. हुर्रे करावे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या पोरांनाही दहीहंडीतील गोविंदांच्या संघर्षाचा मनसोक्त अनुभव घेवू द्यावा. त्यानंतर *गौतमी पाटील* सारख्या एखाद्या सेलिब्रिटी कलाकाराच्या हस्ते घाम, पाणी, काल्याने माखलेल्या सहभागी नेत्यांच्या पोरांचा यथोचित सत्कार करण्यात यावा आणि दरवर्षी गोपाळकाल्यात गोविंदा बनून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.
यावर्षी नेत्यांच्या घरी गोपाळकाल्यासाठी वर्गणी मागायला न जाता दहीहंडी फोडायला गोविंदा म्हणून त्यांच्या पोराला पाठवण्याची मागणी घेवून जावे.
हरे कृष्ण, जय श्रीराम, जयतू हिंदू राष्ट्रम्!
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा