इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
- इंदापूर तालुक्यातील भिमा नदीवरील हिंगणगाव ते नीरा नरसिंहपूर पर्यंतच्या नळ पाणीपुरवठा योजना ह्या भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळे गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांना यापुढील काळात पाणी उपलब्धतेसाठी टणू, भाटनिमगाव व नरसिंहपूर बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी साठवण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क केला असून मागणीचे पत्रही पाठविले आहे. याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. भीमा नदीमध्ये सध्या उजनी धरणातून सोलापूर, पंढरपूर शहराला पिण्यासाठी तसेच भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून
असणाऱ्या गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये भीमा नदीवरती भाटनिमगाव, टणू, नरसिंहपूर या ठिकाणी 3 मीटर उंचीचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. सदर बंधाऱ्याच्या पाण्यावरती इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर, टणु, पिंपरी बु., गिरवी, लुमेवाडी, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, सुरवड, भाटनिमगाव, बेडसिंग, बाभूळगाव, हिंगणगाव तर माढा तालूक्यातील टेंभुर्णी, शेवरे, चांदणे, टाकळी, गारअकोले, आलेगाव, रूई, रांजणी आदी अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
त्यामुळे सदर गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी बंधाऱ्यांत किमान दिड मिटर उंचीची पाण्याची साठवण करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान, भीमा नदीवरील टणू, भाटनिमगाव व नीरा नरसिंहपूर बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धिरज साळे, तसेच कार्यकारी अभियंता सा.क. हारसुरे
यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा