*सहसंपादक -डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी*
*इंदापूर,मो. 9922419159*
इंदापूरचा हरहुन्नरी, अष्टपैलू क्रिकेटपटू एजाज शेखलाल कुरेशी याने पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपली दमदार छाप उमटवत देशपातळीवर इंदापूरचे नाव गौरवाने उंचावले आहे. देशातील सर्वांत मोठी टेनिस बॉल क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएसपीएलच्या तिसऱ्या सीझनमध्ये एजाजला तब्बल १६ लाख ५० हजार रुपयांची भव्य बोली लागली असून त्याची मुंबई संघाने चुरशीच्या स्पर्धेत बाजी मारत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
डावखुरा सलामीचा फलंदाज, तितकाच प्रभावी डावखुरा गोलंदाज आणि मैदानावर चपळ क्षेत्ररक्षण करणारा चित्ता अशी एजाज कुरेशीची ओळख आहे. यंदाची स्पर्धा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सुरत येथे रंगणार आहे.
यापूर्वी पहिल्या सीझनमध्ये त्याची मुंबईने ३ लाख तर दुसऱ्या सीझनमध्ये बेंगळुरू स्ट्रायकर्सने १० लाख रुपयांची बोली लावून एजाजला आपल्या संघात घेतले होते. सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरीमुळे या तिसऱ्या सीझनमध्ये त्याची किंमत विक्रमी वाढून १६.५ लाखांवर पोहोचली आहे. एजाजला आपल्या तंबूत खेचण्यासाठी टायगर्स ऑफ कोलकत्ता, माझी मुंबई आणि हैदराबाद या संघांमध्ये प्रचंड स्पर्धा होती मात्र या स्पर्धेत अखेर मुंबई ने बाजी मारली.
इंदापूरमधील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एजाज कुरेशीने प्लास्टिक बॉलपासून क्रिकेटचा प्रवास सुरू केला. त्याचे वडील शेखलाल हे शहर कसबा टीम मध्ये ओपनिंग जलदगती गोलंदाज म्हणून लेदर बॉल वर खेळत होते. त्यांचाच वारसा पुढे चालवत त्याने देशभरातील प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये चमकदार व लक्षवेधी कामगिरी साकारली. सन २०१५ मध्ये दुबईतील १० पीएल स्पर्धेत खेळल्यानंतर त्याचा क्रिकेट प्रवास अधिक गतीने पुढे गेला. त्यानंतर सन २०१९–२०२० दरम्यान लंडनमध्ये झालेल्या टेनिस विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्याचा त्याला मान त्याला मिळाला. त्या स्पर्धेत भारताने विश्वचषक जिंकला. देशातील सुप्रीमो चषक, रतनबुवा चषक, गोवा एसपीएल, प्रहार चषक, क्रिकोन चषक यांसारख्या नामांकित स्पर्धांमध्ये त्याने आपली लक्षवेधी कामगिरी उंचावली. यासह दुबई, सौदी अरेबिया, कुवेत येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील त्याची कामगिरी गाजली. भारतीय संघातील माजी खेळाडू युसुफ पठाण याने देखील एजाज च्या खेळाचे इंदापूर येथे येऊन कौतुक केले आहे.
सध्या एजाज पुण्यात कठोर सराव करत असून फिटनेस, नेट प्रॅक्टिस आणि शारीरिक तयारीवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. कुरेशीच्या या तेजस्वी यशामुळे इंदापूरमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंदापूर तालुक्याचा नावलौकिक उंचावल्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, क्रिकेटपट्टु संजय उर्फ डोनाल्ड शिंदे यांनी एजाज कुरेशीचे अभिनंदन केले आहे. एजाज शेखलाल कुरेशी याने मुंबई संघाने दिलेल्या संधीचे निश्चित सुवर्णसंधीत रूपांतर करून तालुक्याच्या नावलौकिकात निश्चित भर घालील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
*एजाज कुरेशी यांचे "टाइम्स 45 न्यूज मराठी चॅनेल "समूहाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा