इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: मराठा आरक्षण सरकारने तातडीने द्यावे ह्या मागणीसाठी बागलफाटा (बावडा, ता. इंदापूर) येथे आज दि. २५ पासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या साखळी उपोषणासाठी बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील मराठा बांधव आक्रमक झाला आहे. मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले नसल्यामुळे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला आमरण उपोषणाची परवानगी द्यावी अशा प्रकारचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले असल्याचे मराठा बांधवाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तसेच मराठा समाजाच्या वतीने ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्याच्या आतील आरक्षण मिळावे म्हणून अनेक वेळा महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने झाली व चालू आहेत. यामध्ये अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या करीत स्वतःचे जीवन संपविले आहे. यामुळे मराठा बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असून ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने बागलफाटा (बावडा) या ठिकाणी आज दि. २५ पासून सुरु होत असलेल्या साखळी उपोषणाची दखल न घेतल्यास दि. २८ पासून आमरण उपोषण करण्याची परवानगी इंदापूरचे तहसीलदार यांनी द्यावी अशा प्रकारची विनंती वजा इशारा मराठा बांधवांनी देऊन आक्रमक पवित्र घेतला आहे.
त्यामुळे मराठा बांधवांच्या या मागणीवर तहसीलदार काय निर्णय घेतात हे बघावे लागेल. सदर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाप्रमाणे पुणे जिह्यातील हे सुद्धा आंदोलन सुरु झाल्यास ते चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामधून मराठा आंदोलक व सरकार यांच्यामध्ये मोठा संघर्ष होण्याचे संकेत मिळू शकतात असे जाणकार मंडळींकडून भीती व्यक्त करण्यात येत असून बावडा गावासह इतर गावातील नागरिकांत सुद्धा याची चर्चा जोर धरू लागली आहे.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा