इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- बावडा ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने सरपंचपदी मुस्लिम की माळी की इतर कोणी यापैकी कोणत्याही एका समाजाचा होणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. त्यातूनही जर मुस्लिम समाजाला डावलून इतरांना दिल्यास मात्र याचा मोठा फटाका संभाव्य निवडणूकात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
बावडा ग्रुप ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून सदस्य व सरपंच पदाचे संभाव्य उमेदवार कोण याचे खलबत्ते मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. वार्डनिहाय सदस्यांच्या निवडी करता घोंगडी बैठका घेतल्या जात असून संभाव्य उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये अनेक इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली उमेदवारी निवड समिती समोर रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. गल्लो गल्ली, चौका चौकात व पारावर संभाव्य उमेदवार कोण याच्या उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. सरपंच पदाच्या उमेदवारा बाबत दोन्हीकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.
बावडा ग्रुप ग्रामपंचायतवर आतापर्यंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु मागील निवडणुकीत परंपरागत विरोधक असणारे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर जमवून घेत ग्रामपंचायत बिनविरोध केली. बिनविरोध निवडणुकीचा जरी फायदा राजकीय मंडळींना झाला असला तरी तोटा मात्र सर्वसामान्य नागरिकांना झाला असल्याची चर्चा मतदारांमध्ये बोलली जात आहे. आता काही होवो यावेळेस मात्र ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असाच ठेका अनेक इच्छुकांनी दबक्या आवाजात बोलून दाखवली आहे.
बावडा ग्रुप ग्रामपंचायतच्या १७ जागेसाठी निवडणूक होणार असून सरपंच जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी आज सोमवार (दि. १६) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवार (दि. २०) ऑक्टोबर पर्यंत त्याची मुदत आहे. सोमवार (दि. २३) रोजी छाननी करण्यात येणार असून बुधवार (दि. २५) रोजी उमेदवारी माघार व चिन्ह वाटप होणार आहे. तर मतदान (दि. ५ नोव्हेंबर) रोजी व निकाल (दि. ६ नोव्हेंबर) रोजी लागणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून मल्लपा ढाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान सरपंच पदासाठी मुस्लिम व माळी समाजातील काहींनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अनेक उमेदवारांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. परंतु निवडणूक बिनविरोधच होणार अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळाली आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असणारे अनेकांनी मागील दोन वर्ष जोरदार तयारी केली होती. त्यामध्ये वाढदिवस, लग्न समारंभ, डोहाळ जेवण, जागरण गोंधळ अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याचे काम त्यांनी केले. परंतु ऐन वेळेला पक्षाच्या वतीने त्यांचा विचार न करता तिसराच उमेदवार देण्याचे घाट घातल्याने नाराजीचा सूर दिसून येत असून याचा फटका संपूर्ण पॅनलला बसण्याची शक्यता बोलली जात आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा