उपसंपादक---नुरजहा़ँ शेख.
टाइम्स 45 न्युज मराठी.
नवरात्र उत्सवात देशांतर्गत कांद्याची मागणी नेहमीच कमी राहत असल्याने यंदा नवरात्र उत्सवात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. कांदा भाव वाढीसाठी नवरात्र उत्सवात पोषक परिस्थिती असतानाही दर वाढ होऊ शकले नाहीत.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे नवरात्र उत्सव हा हिंदू सनातन धर्मात अतिशय पवित्र सण आहे. या नऊ दिवसांच्या काळात हिंदू सनातन कुटुंबात कांदा आणि लसणाचे सेवन केले जात नाही. मांसाहार देखील केला जात नाही.
हेच कारण आहे की या नऊ दिवसांच्या काळात दरवर्षी कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होते. मात्र नवरात्र उत्सवानंतर देशांतर्गत कांद्याची मागणी वाढते. यावर्षी देखील विजयादशमी नंतर कांद्याची मागणी वधारली आहे. मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे बाजार भाव देखील चांगलेच कडाडले होते.
किरकोळ बाजारात कांदा 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. घाऊक बाजारात देखील कांद्याच्या किमती 5000 ते 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्या होत्या. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक दर मिळत होता. सरासरी बाजार भाव सुद्धा 4000 ते 4600 रुपये प्रति क्विंटल एवढे झाले होते.
यामुळे गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला होता. पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण की गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी बाजारात कांदा दरात घसरण पाहायला मिळत आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला असता या मार्केटमध्ये गेल्या तीन दिवसांत कांदा बाजार भाव तब्बल 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घसरण नमूद करण्यात आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते.
या बाजारात मिळणाऱ्या बाजारभावावरूनच राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ठरतात असा समज आहे. आता याच बाजारात कांद्याच्या दरात गेल्या तीन दिवसात जवळपास आठशे रुपयांपर्यंतची घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
खरंतर केंद्र सरकारने कांद्यासाठी आकारलेले 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नवरात्र उत्सवानंतर कांद्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे लाल कांदा उत्पादन अजूनही बाजारात अपेक्षित प्रमाणात पाहायला मिळत नाहीये. उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट येणार आहे.
उन्हाळी हंगामातील साठवणुकीतील कांदा देखील आता जवळपास संपत आला आहे. परिणामी बाजारात खूपच कमी आवक आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे असतानाही मात्र गेल्या तीन दिवसांपासून दरात घसरण होत असल्याने शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क रद्द केले आहे. पण ८०० डॉलर प्रति टन निर्यातमूल्य लागू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. यामुळे केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था तयार करत आहे. शिवाय असा परिणाम म्हणून कांदा निर्यात महागली आहे.
एकंदरीत ही एक अप्रत्यक्षरीत्या करण्यात आलेली निर्यात बंदी आहे. याचा परिणाम असा झालाय की आता कांदा खरेदीसाठी व्यापारी हिंमत करत नाहीयेत. म्हणून आता कांद्याचे दर कोसळत आहेत.
लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला काय भाव मिळतोय
राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरला लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला किमान 2000, कमाल 4899 आणि सरासरी 4200 एवढा भाव मिळाला होता. 2 नोव्हेंबर रोजी या एपीएमसीमध्ये कांद्याला किमान 1500, कमाल 5596 आणि सरासरी तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
3 नोव्हेंबर रोजी या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार चारशे, कमाल 4246 आणि सरासरी तीन हजार 650 रुपये एवढा भाव मिळाला आहे. खरंतर या मार्केटमध्ये 30 ऑक्टोबर 2023 ला किमान एक हजार 901, कमाल 5200 आणि सरासरी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला होता.
एकंदरीत गेल्या तीन दिवसापासून लासलगाव एपीएमसी मध्ये सातत्याने कांदा बाजार भावात घसरून होत असून आत्तापर्यंत आठशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सौजन्य ;--
वार्ताहर -आवाज महाराष्ट्राचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा