विशेष प्रतिनिधी--राजु (कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
बहुतांश अन्नधान्यांच्या दरात वाढ झालेली असताना खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत.
गेल्या वर्षी दिवाळीत खाद्यतेलांचे दर तेजीत होते. परदेशातून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. खाद्यतेलाची आयात वाढलेली आहे.
इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली. गेल्या वर्षी दिवाळीतील खाद्यतेलाचे दर विचारात घेता यंदा खाद्यतेलांच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात नुकतीच १०० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलेवगळता बहुतांश अन्नधान्याचे दर तेजीत आहेत. खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे, असे निरीक्षण मार्केट यार्डातील चिमणलाल गोिवददास पेढीचे भागीदार, खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी दिवाळीत घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जायचे. गेल्या काही वर्षांपासून गृहिणी बाजारपेठेतून तयार फराळाचे पदार्थ खरेदी करतात. कामाच्या व्याप सांभाळून फराळाचे पदार्थ तयार करणे गृहिणींना शक्य होत नाही. त्यामुळे तयार फराळाचे पदार्थ खरेदी करण्याकडे कल वाढला असून, दिवाळीत मिठाईविक्रेते, फराळ तयार करणाऱ्यांकडून खाद्यतेलांना मागणी वाढते. घरगुती ग्राहकांकडून खाद्यतेलांना असलेल्या मागणीत घट होत चालली आहे. – कन्हैयालाल गुजराती, खाद्यतेल व्यापारी, मार्केट यार्ड
खाद्यतेलांचे १५ किलोचे दर (कंसात गेल्या वर्षी दिवाळीतील दर)
पाम : १३५० ते १५०० रुपये (२१०० ते २१५० रुपये)
सूर्यफूल : १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सोयाबीन : १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सरकी : १४०० ते १५५० रुपये ( २२०० रुपये)
वनस्पती तूप : १४०० ते १६०० रुपये (१९०० ते २००० रुपये)
शेंगदाणा : २७०० ते २८०० रुपये (२८०० ते २९०० रुपये )
सौजन्य ;-
वार्ताहर--आवाज महाराष्ट्राचा.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा