इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- दिवाळीत लक्ष्मी पुजनावेळी लागणाऱ्या लाह्या, बत्ताश बरोबरच केरसुणीला (लक्ष्मी) महत्त्व आहे. लक्ष्मीचे प्रतीक मानली जाणारी ही केरसुणी बनवून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे केरसुणी विक्री दर ज्यादा मालाच्या उपलब्धतेमुळे कमी झाले आहेत.
केरसुणी बनवण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटकमधून येणाऱ्या कच्च्या मालाच्या भावात कमी झाल्याने दरही कमी करावे लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात सफाईची विविध साधने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, केरसुणीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. प्रथेप्रमाणे पूजा करण्यासाठी केरसुणीचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
पूर्वी साफसफाई करण्यासाठी झाडू म्हणून झाडांच्या झावळ्याच्या पानांचा वापर केला जायचा. ही केरसुणी सुतळी व वाकाचे घायपातीच्या सहाय्याने बांधल्या जात. पण सध्या नायलॉन दोरीच्या साह्याने केरसुणी आवळून बांधण्यात येत असल्याने ही बाब खर्चीक बनली आहे. याबाबत सखुबाई गायकवाड म्हणाल्या, "आमचा बाराही महिने केरसुणी विक्रीचा व्यवसाय असून दिवाळीत २००० ते ३००० केरसुणींना मागणी असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कच्च्या मालाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे केरसुणीच्या किमतीही कमी झाले आहेत. मोठी केरसुणी ऐंशी रुपये, मध्यम साठ रुपये तर लहान पन्नास रुपये अशा दरात विकावी लागत आहे.
केरसुणी विक्रेते अरूण गायकवाड म्हणाले, "सध्या आपल्या परिसरात कच्चा माल सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यातच दिवसेंदिवस शिंदोळीच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून कच्चामाल माढा तालुक्यातील लऊळ येथे आणण्यात येतो. तिथे जाऊन तो घेऊन यावा लागतो."
केरसुणी विक्रेते शोभा मोहिते म्हणाल्या, "मागील वर्षीच्या तुलनेत डिझेलचे दर वाढले असल्याने कच्चा माल आणण्यासाठीचे भाडेवाढले आहे. तसेच परिसरातील गावे व बाजारात जाऊन माल विकावा लागतो आहे. परंतु बाजारात केरसुणी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने विक्रीचा दर परवडत नसतानाही कमी करून विकावा लागत आहे.'
फोटो - बावडा येथील अरून गायकवाड केरसुणी बनवून विक्रीसाठी जागेवरच उपलब्ध करून देत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा