इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- समाजातील उपेक्षित घटक असणाऱ्या विधवा भगिनींना मान व सन्मान मिळवून देण्याचे अभिमानास्पद कार्य कामधेनू सेवा परिवाराकडून केले जात आहे. आजही समाजातील अनिष्ट रूढी व परंपरांचा त्रास विधवा भगिनींना होत आहे. या कालबाह्य रूढी परंपरांच्या विळख्यामधून विधवा भगिनींना मुक्त करण्याचे अद्वितीय कार्य कामधेनू सेवा परिवार करीत आहे, असे गौरोवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
सुरवड येथे कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला भाऊबीज कार्यक्रम उत्साहात व गर्दीत संपन्न झाला. या सोहळ्याचे १५ वे वर्ष होते. या कार्यक्रमास पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातील विधवा भगिनीं तसेच आजी-माजी जवानांच्या पत्नी व माता आणि वीरमाता व वीरपत्नी अशा सुमारे चार हजार महिलांना साडी-चोळी व त्यांच्या मुलांना कपडे व मिष्ठान्न भोजन यावेळी देण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कामधेनू सेवा परिवार मार्फत विधवा भगिनींच्या शेकडो मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले जात आहे. तसेच लग्नकार्यासाठीही मदत केली जात आहेत. सदरचे सामाजिक कार्य कौतुकास्पद व समाजाला प्रेरणा देणारे आहे.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिवर्षी प्रमाणे या सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. अशा कार्यक्रमांमुळे विधवा बहिणींना समाजामध्ये मानसन्मान मिळत असून, हा अद्वितीय असा सामाजिक सोहळा असल्याचे कौतुकही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणामध्ये केले.
प्रास्ताविक भाषणात कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी सांगितले की, समाजातील विधवा भगिनींनी जोडवे, मंगळसूत्र, कुंकू हे सौभाग्य अलंकार वापरावेत. तसेच पुरुषांनीही दुर्दैवाने स्वतःला काही झाले तर पत्नीने सौभाग्य अलंकार वापरावेत, अशी प्रतिज्ञा करावी, असे आवाहन यावेळी समाजभूषण डॉ. आसबे यांनी केले.
सोहळ्याचे उद्घघाटन वीरपत्नी हेमलता बाबूराव साबळे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. महेश महाराज माकणी, शिल्पा संभाजी मारकड शेंडगे (कृषी उपसंचालक) यांची भाषणे झाली. कार्यक्रमामध्ये विधवा भगिनींनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी अशोक घोगरे, अँड. मनोहर चौधरी, अँड. अनिल पाटील, दूधगंगाचे चेअरमन उत्तमराव जाधव, पै. रावसाहेब मगर, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दादासाहेब घोगरे, चांगदेव घोगरे, मनोज जगदाळे, मिलिंद पाटील, बाळासाहेब घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार आप्पासो घाडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामधेनू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे व सदस्यांनी परिश्रम घेतले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा