*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे.
खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-5 ने रविवारी पहाटे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोमुख परिसरातील एका खाडीजवळ खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यावेळी 19 ते 20 वयोगटातील तरुण आणि तरुणी मोठ्या आवाजात डीजे लावून पार्टीमध्ये अंमली पदार्थ आणि अल्कहोलचे सेवन करताना आढळले.
पोलिसांनी छापेमारीदरम्यान 200 ग्रॅम गांजा, 70 ग्रॅम चरस, 0.40 ग्रॅम एलएसडी आणि काही एक्स्टसीच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. तसेच 90 पुरुष आणि 5 महिलांना ताब्यात घेतले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्याआधारे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली. तसेच ताब्यात घेण्यात आलेले तरुण-तरुणी हे ठाण्यासह मीरा रोड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई भागातील असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की तेजस कुणाल (वय - 23, रा. पलाका, डोंबिवली) आणि सुजल महाजन (वय - 19, रा. कळवा, ठाणे) यांनी ही पार्टी आयोजित केली होती. यासाठी त्यांनी एका व्यक्तीमागे 1 हजार रुपये प्रवेश शुक्लही आकारले होते. पार्टी सुरू होण्याच्या 2 तास आधी त्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून स्थळाची माहिती दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या पार्टीसाठी अंमली पदार्थ कोणाकडून आणले जात होते याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिले आहे.
*सौजन्य*;--
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा