इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
टाइम्स 45 न्युज मराठी
मोबाईल-8378081147
बावडा गावातील जनतेचा पिढ्यान-पिढ्यांपासून आमचेवरती असलेला विश्वास हा आम्हाला सतत विकास कामे करण्यासाठी बळ व ऊर्जा देत असतो. आगामी पाच वर्षासाठी गावचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळातही बावडा गाव सर्वांगीण विकास कामांमध्ये प्रगतीपथावरच राहील, अशी स्पष्ट ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे दिली.
बावडा ग्रामपंचायतीच्या नव निर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ग्रामसचिवालयासमोर आयोजित करण्यात आला. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी गावासाठी प्रस्तावित विविध विकास कामांचा आढावा घेतला. एका सर्वसामान्य कुटुंबातील ओबीसी समाजातील पल्लवी रणजित गिरमे यांना सरपंच पदाचा मान दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, गावासाठी रू.14.50 कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. त्याबरोबर खंडोबानगर येथे तब्बल 150 कोटी लि. क्षमतेचा पाणी साठवण तलाव केला जाणार आहे. त्यामुळे बावडा गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे 33 लाख रुपयांचा अश्वारूढ भव्य पुतळा तयार झाला असून 31 जानेवारी पर्यँत बावडा येथे पोहोच होईल. या पुतळ्यासाठी चबूतरा व इतर कामे लवकरच पूर्ण होतील. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुशोभीकरणाची विकास कामे करण्यात येतील.
बावडा गावामध्ये नवीन एसटी स्टँड, महिलांसाठी अस्मिता भवन, गायरान जागेत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या नावावर जागा करणे, मी मंत्रीपदावर असताना 8 कोटी रुपये खर्चून वालचंदनगर रस्त्यावर बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयात जनतेला वैद्यकीय सेवा सुरु करणे, गावातील स्ट्रीट लाईटच्या खांब-तारा बदलणे, स्वच्छतेसाठी आय लव-बावडा उपक्रम राबविणे, नागरिकांना मुबलक स्वच्छ पाणी मिळणे आदि अनेक कामांच्या विकासाचे पर्व गावामध्ये सुरुच राहील. गावातील सर्व जातीचा-धर्माना व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी गावचा एक नागरिक म्हणून माझी राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट करीत ग्रा.पं.चे मावळते सरपंच किरण पाटील यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते अशोक घोगरे यांनी सांगितले की, तालुक्याचा विद्यमान लोकप्रतिनिधी हा फसवा माणूस आहे. त्यांनी बावडा गावच्या विकासासाठी निधी दिलेला नाही. एखाद्या कार्यकर्त्याला कामापुरते जवळ करायचे व सोडून द्यायचे, नंतर दुसऱ्या कार्यकर्त्याला जवळ धरायचे व गरज संपल्यावर सोडून द्यायचे, अशी त्यांची राजकारणाची नीती असल्याची टीका केली.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजित घोगरे व ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचाही ग्रामपंचायत वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. यावेळी निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, अँड. अनिल पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, संतोष सूर्यवंशी, सुप्रिया कांबळे यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, मावळते सरपंच किरण पाटील, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, संतोष पाटील, जयवंत सूर्यवंशी, विकास पाटील, दिलीप पाटील, मिलिंद पाटील, शिवाजीराव पवार, सुधीर पाटील, सुनील घोगरे, प्रसाद पाटील, अजय पाटील, समीर मुलाणी, शंकर घोगरे, हरिभाऊ बागल, नामदेव घोगरे, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, बापूराव शिंदे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावशे, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे व एस. टी. मुलाणी यांनी तर आभार उपसरपंच रणजित घोगरे यांनी मानले.
•चौकट :-
-----------
हर्षवर्धन पाटील यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक!
या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामसचिवलयामध्ये बावडा गावच्या विकास कामांसंदर्भात महसूल, वीज वितरण, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास आदी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यामध्ये बावडा गावच्या विकासासाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आले.
__________________________
फोटो:-बावडा येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी भाजप नेते हर्षवर्धन पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा