*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी साडेचार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आंदोलन करीत आहेत. दरम्यान, सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हजारो समाजबांधव अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पोलिस-आंदोलक यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर या आंदोलनाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आणि राज्य शासनाच्या कायदा तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी शासनाला दोन वेळा मुदतवाढ दिली. पण, मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी ते अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी रवाना झाले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला.
अंतरवालीतून हजारो समाज बांधव हाती भगवे झेंडे, गळ्यात भगवे रुमाल, डोक्यात टोप्या घालून चालत होते. ठीक ठिकाणी जरांगे यांचे महिलांनी औक्षण केले. पुढे गावोगावी यात आणखी भर पडली गेली. पदयात्रेत सहभागींनी जोरदार घोषणाबाजी करीत मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय परत न येण्याचा निर्धार केला. अंतरवाली सराटी येथून सकाळी ११ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली.
वडीगोद्री ते अंकुशनगर हे अवघे पाच किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागला. हजारोंच्या गर्दीमुळे सोलापूर-धुळे महामार्ग तब्बल चार तास ठप्प होता. त्यामुळे ही पदयात्रा मुंबईत दाखल झाल्यावर मुंबईची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात शंभर पोलिस अधिकारी, साडेपाचशे पोलिस कर्मचारी, साडेचारशे होमगार्ड, एसआरपीएफची कंपनी, रॅपिट ॲक्शन फौर्सची कंपनी, आरसीपीच्या दोन कंपन्या बंदोबस्त कामी तैनात करण्यात येणार आहे. हा बंदोबस्त शहागडपर्यंत तैनात करण्यात आला होता. शिवाय या पायी यात्रेवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली होती.
राज्य सरकार फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा कायदा करणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा. आरक्षणासाठी सर्व्हे करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
व्हॅनिटी व्हॅनचा वापर जरांगेंनी टाळला
बीड - मुंबईला उपोषण यात्रेसाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी बीडच्या समन्वयकांनी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध केली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी या व्हॅनचा वापर टाळला. शनिवारी अंतरवाली सराटीहून मातोरीकडे निघालेले मनोज जरांगे पाटील अंतरवाली ते शहागड कारखान्यापर्यंत पायी चालले. नंतर ते नियमित वाहनात बसले. पुढे काही काळ चालून पुन्हा त्यांनी त्याच वाहनाचाच वापर केला. मात्र, व्हॅनिटी व्हॅन त्यांनी टाळली. व्हॅनमध्ये शयनगृहासह शीतगृह, स्वच्छतागृह, टीव्ही अशा सुविधा आहेत.
महिनाभराचे रेशन सोबत
या पदयात्रेत राज्यभरातून आलेले समाज बांधव सहभागी आहेत. अनेकांनी आपआपली वाहनेही सोबत आणली. या वाहनांमध्ये महिनाभर पुरेल एवढे धान्य, पीठ, मीठ, तेल, चटणी असे साहित्य त्यांनी सोबत घेतले. शिवाय वाहनांमध्येच आराम करण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये पिकअप, ट्रक, ट्रॅक्टर, कार, दुचाकी अशा विविध वाहनांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनामध्ये पाण्याचे जार, ट्रॅक्टरमध्ये पाण्याची टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या पदयात्रेत जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आरोग्य विभागाकडून दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. शहागडपर्यंत या दोन रुग्णवाहिका सोबत होत्या. पुढे ही यात्रा बीड जिल्ह्यात पोचली.
*सौजन्य*
*कोकण न्युज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा