*इंदापूर तालुका ,प्रतिनिधी*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
निमसाखर ता.इंदापूर येथे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही दिनांक 17 फेब्रुवारी ते दिनांक 19 फेब्रुवारी असा तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, निमसाखर यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते.
17 फेब्रुवारी रोजी सकाळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूरच्या मुक्ताई ब्लड बँक ने यासाठी सहकार्य केले. यावेळी 51 पिशव्या रक्त संकलित झाले. त्याचदिवशी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन केले होते. यावेळी गावातील महिलांनी व जेष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या आरोग्य शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निरवांगी येथील डॉ दत्तात्रय मुंडफणे, डॉ किसन हेगडकर, आरोग्य सेविका मालन चव्हाण, आरोग्य सहाय्यक सुरेश कांबळे, महालॅब टेक्निशियन अजित गायकवाड आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. तर अद्वैत मेडिकल फाउंडेशन नातेपुते यांच्याकडून डॉ आरती कुंकारी व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील डॉ प्रशांत पिसे, डॉ संगीता तोडकर यांनी भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. यावेळी 309 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी केली.
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर महिलांसाठी सायंकाळी रेशीमगाठी मंगल कार्यालय येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्री एम के इनामदार सर व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली उपस्थित होते. यामध्ये प्रथम क्रमांक सोन्याची नथ विजेत्या सौ पल्लवी अनिल रणवरे, द्वितीय क्रमांक 5 ग्रॅम चांदीचे नाणे विजेत्या सौ शीतल विजय गांधी, तृतीय क्रमांक 3 ग्रॅम चांदीचे नाणे विजेत्या सौ नलिनी अविनाश रणवरे ठरल्या. होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी चंदूकाका सराफ & सन्स यांनी तीनही बक्षीसासाठी मोलाचे सहकार्य केले. रात्री मुख्य राजवाड्यात मर्दानी खेळ आयोजित करण्यात आले होते. यासाठी शिवप्रताप ग्रुप इंदापूर यांनी सहकार्य केले.
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवछत्रपतींच्या भव्य मुर्तीची रथामधून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील व वाड्यावस्तीवरील अनेक शाळांतील मुले मुली व महिला पुरुष यांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांना भगवे फेटे व भगव्या टोप्या घालण्यात आल्यामुळे गावातील वातावरण भगवेमय झाले होते. नाशिक ढोल पथक व हलगी यांच्या तालावर लहान मोठ्यांनी ठेका धरला. दुपारी सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. रात्री मुख्य राजवाड्यात स्वरसंगम प्रस्तुत शिवगीते व पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाहीर मल्हार माने व गायक पांडुरंग वाघ यांच्या संपूर्ण टीमने उपस्थित नागरिकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. शिवजन्मोत्सव सोहळ्याचे हे 13 वे वर्ष होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा