*धाराशिव---रवि कोरे आळणीकर.
धाराशिव ---राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळावे म्हणून पक्षास १० कोटी रुपयांचा निधी दिला असे सांगितले. पक्षासाठी तुमच्यासारखे अनेकजण निधी देतात. मात्र मातोश्रीचे दरवाजे खासदार ओमराजे यांनीच पहिल्याप्रथम तुमच्यासाठी उघडले याची जाणीव ठेवा असा पलटवार शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदु भैय्या राजेनिंबाळकर यांनी दि.११ मार्च रोजी केला. दरम्यान, मंत्रीपद दिले ते लोकांचे वडील काढण्यासाठी नसून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या शस्त्रक्रियेसाठी आपण आरोग्य मंत्री म्हणून त्या फाईलवर सही केली. तो कर्तव्याचा भाग होता. मात्र आपण त्यांच्यावर उपकार केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव येथील राजे कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेनिंबाळकर महाले की, दि. ७ व ८ मार्च रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औसा, उमरगा, तुळजापूर, कळंब, परंडा व भूम येथे दौरा करून पाच ठिकाणी सभा घेतल्या. त्यानंतर मंत्री सावंत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर टीका केली. आजपर्यंत अशा पद्धतीची टीका जिल्ह्यात झालेली पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सावंत यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. जिल्हा भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने लौकिक झालेला आहे. परंतू आता हा जिल्हा बदनाम झाला असल्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हद्दपार करावे असे आवाहन त्यांनी केले. तर २०२२ नंतर सत्तांतर झाल्यानंतर सावंत यांनी पालकमंत्री झाल्यापासून अतिशय खालच्या पातळीचे वागणे व बोलणे सुरू केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील अशा प्रकारचे वक्तव्य करणारा माणूस नकोसा झाला असल्याचे सांगत सावंत यांच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे त्यांना पालकमंत्रीपद कशासाठी मिळाले ? मंत्री म्हणून जी शपथ घेतली त्याचा त्यांना बहुदा विसर पडलेला दिसत असल्याचा टोला लगावला. तसेच कृष्णा खोऱ्याच्या पाण्याची पाहणी करून ते पाणी माझ्यामुळेच आले असा भास निर्माण केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या पाण्यासाठी २००४ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण यांनी खूप मोठा पाठपुरावा असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यानंतर खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी या योजनेतील कामाचे प्राधान्यक्रम बदलून घेतले. त्यामुळे निधी उपलब्ध करुन निविदा प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी हे पाणी जून - जुलै २०२४ अखेरपर्यंत धाराशिव जिल्ह्यात येणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान सत्तांतर झाल्याने हे काम सुरळीतपणे सुरू आहे. मात्र मंत्री सावंत हे मी पाणी आणणार असल्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असून दीड वर्षात पाणी येत नसते असे सांगितले.
महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. मंत्री सावंत हे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले असल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र त्यांनी वैद्यकिय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करु शकले नाहीत. त्याबरोबरच आवश्यक असणाऱ्या आस्थापनेची वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर नर्स, वार्ड बॉय व इतर कर्मचाऱ्यांची पदे का भरली नाहीत ? असा सवाल त्यांनी केला. तसेच राजकारण करताना जनतेसाठी काम करतो का ? ते पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री नसताना झेंडावंदन केले. त्यावेळी केलेल्या भाषणात जीडीपी इतर जिल्ह्यापेक्षा कमी आहे. तो मी वाढविण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन सावंत दिले होते. आता किती आहे, तो कसा काढतात ? हे त्यांनी सांगावे असे आव्हान राजेनिंबाळकर यांनी दिले. तसेच बेफामपणे बोलत जायचे, कोणी विचारत नाही अशा अविर्भावात त्यांनी राहू नये. यापुढे अशा प्रकारचे वक्तव्य खपवून गेले जाणार नसल्याचा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.
खासदार ओमराजे यांचे वडील कै पवन राजेनिंबाळकर हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहेत. त्यांच्या नखाची देखील बरोबरी होऊ शकत नाही. त्यांनी निस्व:र्थपणे मदत केली. मात्र आपण ज्या पद्धतीने राजकारण करता हे यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कचऱ्याचे पैसे देण्यासाठी १५ ते २० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. कचऱ्याची कामे १५ व्या वित्त आयोगातून केली जातात. मात्र तो निधी का येत नाही यासाठी आपण काय प्रयत्न केलेत का ? हे सांगावे असे आव्हान करीत मूलभूत गरजा कडे लक्ष न देता भडकाऊ भाषण करून निवडणुकीचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा