Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० एप्रिल, २०२४

सत्ता त्यांची अन् हिशोब मला मागतात : शरद पवार कन्हेरी येथे मारुती मंदिरात नारळ फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला शुभारंभ

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

-- देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील अनेक सभांमध्ये दहा वर्षात शरद पवारांनी काय केले असा सवाल उपस्थित करतात. खरे पाहता दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. सत्तेमध्ये ते स्वतः असताना मला विचारतात की मी दहा वर्षात काय केले. सत्ता त्यांच्याकडे आणि हिशोब मला मागतात अशी गंमत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विधानाची खिल्ली उडवली.


 कन्हेरी (ता. बारामती ) येथे शुक्रवारी (ता.१९) परंपरेप्रमाणे येथील श्रीक्षेत्र मारुती मंदिरात नारळ फोडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कन्हेरी येथील मारुती मंदिरातून सुरुवात केली की यश हमखास मिळते. देशातील ५४३ खासदारांमध्ये पहिल्या दोन खासदारात सुप्रिया सुळे यांचे नाव आहे. ही सोपी गोष्ट नाही. देशात आज काहीतरी वेगळे घडत आहे. हे वेगळे घडत असताना तुमच्या अधिकारावर देखील गदा येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री बेंगलोर येथे म्हणतो की आम्हाला या देशाची घटना बदलायची आहे. यावरूनच त्यांचे हेतू स्पष्ट होतात. आज पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र जे तुम्ही पिकवता त्या पिकाला दर नाही. साखर, दूध वेगवेगळी पिके यांच्या दरांची सद्यस्थिती काय आहे. ज्यातून तुमच्या खिशात पैसे येतील ते स्वस्त करायचे आणि ज्या माध्यमातून त्यांचे खिशे भरले जातील ते महाग करायचे. वरच्या खिशात तुम्हाला अनुदान द्यायचे आणि खालच्या खिशातून काढून घ्यायचे. अशा पद्धतीचे काम सध्या सुरू आहे, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. दरम्यान यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, आमदार रोहित पवार, विकास लवांडे, युगेंद्र पवार यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला बारामती सह राज्यभरातील अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पवार कुटुंबातील राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, रणजीत पवार आदींसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------

 नाव न घेता अजित पवारांना कोपरखळी....

 ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, यावेळी आपले चिन्ह बदलले आहे. तुतारीच्या चिन्हा समोरील बटन आपल्याला दाबायचे आहे. काही लोकांनी ते कसे दाबायचे सांगितले तसे आपल्याला दाबायचे नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर येथे केलेल्या विधानावरून कोपरखळी मारली. तसेच आपल्याला वाद संघर्ष वाढवायचा नाही. तर मनापासून काम करायचे आहे. माझे बटन दाबले तर मी तुमच्यासाठी काम करेन असा प्रकार येथे नाही. देण्याघेण्याच्या गोष्टी मी करणार नाही. तर मनापासून लोकांचे काम करायचे, असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा