इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी राज्यासह केंद्राचा निधी मिळवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ बावडा बाजारतळ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई परिवाराचे संचालक प्रविण माने, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, प्रशांत पाटील, विलास वाघमोडे, लालासाहेब पवार, वसिम बुऱ्हाण, श्रीमंत ढोले, उदयसिंह पाटील, डॉ शशिकांत तरंगे, हनुमंत कोकाटे, अंकिता पाटील, सचिन सपकाळ, संजय सोनवणे, सुरेश शिंदे, संग्रामसिंह पाटील, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, सोमनाथ मोहिते, शितल कांबळे आदी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, भाषणे करून वादविवाद घालून रोजगार, शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही हे आमच्या लक्षात आले आहे. नरेंद्र मोदींवर दहा वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे.
भिमा नदीवर गणेशवाडी व भांडगाव येथे बुडीत बंधारे करावेत. तसेच नीरा नदीवर गोंदी व लुमेवाडी येथे बुडीत बंधारे करावेत तसेच नीरा नदीवरील सर्वच बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी. खडकवासला कालवा, निरा डावा कालवा, नीरा व भिमा नदी, शेटफळ तलाव व लाकडी लिंबोडीच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील व मी स्वतः बसून चर्चा केली आहे. राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी सहा लाख कोटी रुपयांचा बजेट मांडतो. परंतु यातून मार्ग निघत नसून यासाठी केंद्राच्या निधीची गरज आहे. सदरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो त्यामुळे अनेक ठिकाणची कामे आम्ही करू शकतो.
मुळशीचे टाटांचे २५ टीएमसी चे धरण वीज निर्मिती करून समुद्रात वाहून जाणारे पाणी शेतीसाठी उपयोगात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच कोयना धरणातून वीज निर्मिती करून वाहून जाणारे पाणी ताकारी म्हैसाळ टेंभू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सांगली, सोलापूर, सातारा येथील शेतीच्या वापरात आणले आहे. निरा व भिमा खोऱ्यातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी देवून खडकवासला पानशेत व वरसगावचे पाणी इंदापूर, दौंड, बारामती, खडकवासला, पुरंदर व हवेली तालुक्यांना पुरणार व सणसर कट मधून पाणी घालणार. वीज निर्मितीनंतर ओरफ्लो झालेले पाणी आपल्या भागातील सर्व साठवण तलाव भरून घेणार आहे. विसरणे ओरफ्लोचे पाणी निरा खोऱ्यात घातल्याने शेटफळ तलाव भरण्यास मदतीचे होते. आपण कोणाचा घास व कोणाच्या तोंडचे पाणी पळवत नाही. याकरिता निधीची गरज असून तो केंद्राकडून आणावा लागणार आहे. त्याकरीता महायुतीचा उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे.
आता आम्हाला एकमेकांच्या विरोधात भांडायच्या ऐवजी बारामती तालुक्यासारखा विकास इंदापूरचा पण करायचा आहे. कोणाच्या मनगटात किती दम आहे ते पूर्णपणे माहित आहे. जर कोणी माझ्या कार्यकर्त्याला धक्का लावला व काही गडबडीचा प्रयत्न केला तर कोणाच्या बापाचे ऐकत नाही. तसेच सचिव, अधिकारी व कर्मचारी यांनी कोणाच्या दबावाखाली काम न करता नियमात बसून काम करावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे. संविधान बदलाचा चुकीचा प्रचार काँग्रेस पक्षाकडून केला जात असून संविधान स्थापनेपासून आतापर्यंत १०६ दुरुस्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ८५ दुरुस्त्या काँग्रेसच्या काळातच झालेले आहेत.
हर्षवर्धन पाटील बोलताना म्हणाले, ही निवडणूक इंदापूर तालुक्याच्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे नवे पर्व घेऊन आलेली आहे. आमची एकत्र बैठकी कोणत्या पदाकरता व समझोता झाला म्हणून नाही. तालुक्यातील शेतीच्या फुटण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याची सोडवणूक करणे गरजेचे आहे. सणसर कट, शिरा डावा कालवा व भाटघरचा प्रश्न ग़भीर झाला आहे. तर निरा नदी वर्षातील आठ महिने पाण्या अभावी कोरडी पडते. त्यामुळे शेतीचा प्रश्न बिकट झाला असून पाणी आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हजार कोटी रुपये लागणार असून ते केंद्र सरकारकडूनच आणावे लागणार आहेत.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, निरा व भिमा नद्यांवर बुडीत बंधारे करणे गरजेचे असून यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. सगळे काही करता येते परंतु पैशाची सोंग करता येत नाही. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणूक करणारे राज्यात देवेंद्र फडणवीस व अजित पवार हेच दोन नेते आहेत. पाण्याचे नियोजन जर केले नाही तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आत्ताची निवडणूक ही गुदगुल्या व गंमत करायची नसून कोणाची जिरवा जिरवीचीही नाही त्यासाठी सर्वांनी एक दिलाने एक मनाने काम करावे.
यावेळी प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले, उदयसिंह पाटील, हनुमंत कोकाटे, अंकिता पाटील आदिंची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास आव्हाड यांनी तर आभार सुरेश मेहर यांनी मानले. तर बावडा येथील मौलाना रशीद अत्तार यांच्याकडे पाहत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तुम्ही काळजी करू नका भविष्यात कोणतेही प्रकारची अडचण मुस्लिम समाजाला येणार नाही.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा