*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई :---मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरून लोकसभा निवडणूक लढवणारे उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला आहे. निकम यांनी राज्यभरातील 29 प्रलंबित खटल्यांमधील विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. राज्य सरकारने निकम यांना संपूर्ण महाराष्ट्रातून ही 29 प्रकरणे सोपवली होती. आता त्यांनी या सर्व प्रकरणांमध्ये राजीनामा दिला आहे. यामध्ये 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासह मुंबईतील आठ प्रकरणांचा समावेश आहे.
निकम यांनी गेल्या शनिवारी भाजपकडून त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या एक दिवस आधी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे राजीनामा पाठवल्याचे समजते. विभागाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून या 29 प्रकरणांमध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. या खटल्यांमध्ये आता इतर सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गुरुवारी मुंबईतील एका न्यायालयात निकम यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली.
निकम यांची गेल्या तीन दशकात अनेक खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते भाजपकडून उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, जिथे पूनम महाजन या भाजपच्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. निकम आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा