*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
स्वतःच्या स्वार्थ आणि खुर्ची वाचवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आजकालच्या राजकारण्यांची आहे. परंतु अगोदर असे नेते होऊन गेले की त्यांनी एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी चुटकी सरशी खुर्ची आणि सत्तेला लाथ मारल्याचे उदाहरण आहेत.
त्यातीलच एक नाव आपल्याला घेता येईल ते म्हणजे राजे लाल श्याम शहा हे होय. हे 1962 च्या लोकसभेला चंद्रपूर मतदारसंघातून धनुष्यबाणावर अपक्ष निवडून आले होते. परंतु गंमत म्हणजे ते फक्त एकच दिवस खासदार म्हणून राहिले होते. याबाबतची माहिती या लेखात घेऊ.
भारतामध्ये अशा अनेक गोष्टी घडवून गेले आहेत की त्या पुन्हा कधीच घडल्या नाहीत व त्या कायम भारतीयांच्या स्मरणात राहून गेल्या. जर आपण स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला तर यामध्ये लोकसभा निवडणुकांचा इतिहास देखील काही गोष्टींनी खूपच रंजक आणि माहितीपूर्ण असा आहे.
आपण आज कालच्या राजकारणाचा आणि या अगोदरचे राजकारण याचा तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एकूणच राजकारण देखील खूप वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत गेले. आज कालचे नेत्यांचा जर विचार केला तर यामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी काहीही करण्याची तयारी आपल्याला दिसून येते.
*राजे लाल श्याम शहा ठरले एक दिवसाचे खासदार*
धनुष्यबाण हे चिन्ह म्हटले म्हणजे आपल्याला शिवसेनेची आठवण येते. परंतु शिवसेनेच्या जन्माच्या आधी धनुष्यबाण या चिन्हावर अपक्ष म्हणून राजे लाल श्याम शहा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्यांनी 1962 च्या लोकसभेला चंद्रपूर मतदारसंघातून लढवून ते अपक्ष विजय झाले होते.
लाल श्याम शहा यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ते वास्तविक चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी देखील नव्हते. आजच्या छत्तीसगड राज्यांमध्ये जो काही राजनांदगावाचा भाग आहे त्या ठिकाणाची लोकप्रिय आदिवासी नेते होते. अगोदर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये पूर्वीच्या सी.पी.अँड बेरार प्रांताचा हा भाग येत होता व या ठिकाणी लाल श्याम शहा हे निवडणुकीला सामोरे गेले होते. या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी धनुष्यबाण चिन्ह घेतले होते.
त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे खासदार व्ही.एन.स्वामी आणि आरपीआयचे देखील उमेदवार होते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला बैलजोडी तर रिपब्लिकनच्या उमेदवाराला हत्ती हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेले होते.
यावरून एक त्यावेळी खूप गाजलेली निवडणूक घोषणा तयार करण्यात आलेली होती व ती म्हणजे ‘छोडो तिर छोडो बाण, हत्ती-बैल दाणादाण’ ही घोषणा खूप दूरवर तेव्हा पसरली व खूप गाजली देखील होती व या सगळ्या परिस्थितीत नवीन असलेले लाल श्याम शहा विजयी झाले होते.
*यामुळे ते ठरले एक दिवसाचे खासदार*
लाल श्याम शहा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ते पहिल्याच दिवशी लोकसभेमध्ये दाखल झाले व त्यांनी सि. पी.अँड बेरार प्रांतातील जो काही आदिवासी भाग आहे त्याची वेगळे गोंडवाना राज्य स्थापन करण्याची मागणी केली. परंतु तेव्हाच्या सरकारी पक्षाकडून त्या मागणीची दखल घेतली गेली नाही.
या गोष्टीवरून लाल श्याम शहा त्यांनी सभागृहामध्येच राजीनामा लिहिला व नंतर दहा दिवसांनी तो मंजूर करण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे ते फक्त एक दिवस आणि कागदावर दहा दिवस इतक्या कमी कालावधी करिता पदावर राहिलेले गेल्या पाऊणशे वर्षातील एकमेव खासदार ठरले आहेत.
*विधानसभा आमदारकीचा राजीनामा देण्याचा देखील विक्रम त्यांच्याच नावे*
या अगोदर ते 1951 आणि 1956 असे दोनदा सी.पी.अँड बेरार विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले होते व त्या ठिकाणी देखील त्यांनी अनेक मागण्यांसाठी राजीनामास्त्र वापरले. जंगलांमध्ये होणाऱ्या अवैधरित्या वृक्षतोडी विरोधात त्यांनी आमदार पदाचा वारंवार त्याग केला
व त्यामुळे त्यांच्या त्या विधानसभा क्षेत्रात एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा पोटनिवडणूक घ्यावी लागली होती व हा देखील एक वेगळा विक्रम त्यांच्या नावे आहे. लाल श्याम शहा हे अतिशय लोकप्रिय नेते होते व त्यामुळे ते कोणत्याही निवडणुकीत अगदी सहजतेने निवडून येत असत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा