Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ६३ वधू वरांचे विवाह मोठ्या उत्साहात संपन्न

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- इंदापूर येथे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ६३ वधू वरांचे विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सोनाई प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळ्याच्या उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीणभैच्या माने यांनी या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी खासदार सौ. सुळे यांनी वधू-वरांना आशीर्वाद तर दिले. प्रविणभैय्या माने व सोनाई प्रतिष्ठानच्या कार्याचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी सौ. सुळे यांनी पंधराशे रुपयांनी बहिणीचे नाते विकत मिळत नसते असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांना लगावला. हवा बदल रही है असे म्हणत व्यासपीठावर असणारे अनेक मान्यवर लवकरच आपल्याकडे येतील असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी खासदार सौ. सुळे, आमदार रोहित पवार यांनी प्रविणभैय्या माने यांचा सत्कार केला. इंदापूर येथील वाघ पॅलेस सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, उत्तमराव जानकर, सुदाम इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ राहुल मखरे, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी उपनगराध्यक्ष अरविंद बाघ, राजेश जामदार, अशोक घोगरे, विधीज्ञ तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे, विलास वाघमोडे, किसनराव जावळे, सौ. लताताई माने, सौ. अनुराधाताई गारटकर, सुनीताताई वाघ, उपस्थित होते.



   सौ. सुळे पुढे म्हणाल्या, सामुदायिक विवाह सोहळ्याचा देखणा कार्यक्रम माने कुटुंबीयाच्या आशीर्वादाने होत आहे. माने कुटुंबाचे व पवार कुटुंबीयांचे पाच दशकाचे ऋणानुबंध असून सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने व पवार साहेबांचे विश्वास व प्रेमाचे नाते आहे. लोकप्रतिनिधी असल्याने माझे लग्न आई-वडिलांनी खूप साध्या पद्धतीने करून लग्नात एकच पेढा अशी आठवण त्यांनी करून दिली.



    यावेळी सोहळ्याचे आयोजक प्रविण भैय्या माने म्हणाले, सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून सोनाई प्रतिष्ठान च्या वतीने यापूर्वी देखील ७५ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम यशस्वी पद्धतीने राबविण्यात आला होता. त्याच बरोबर प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान, नेत्र दान, योग शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, कोरोना मध्ये कीट वाटप, दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी चारा छावणी आदी विधायक उपक्रम राबविले आहेत. आदरणीय दशरथदादा माने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोनाई उद्योग समूहाची यशस्वी उभारणी केली त्यांचे लग्न सायकलवर तर त्यांनी आमची लग्ने हत्तीवर लावली. आता वधूवरांची लग्ने घोडे, उंटावर लागत आहेत. समाज केंद्रबिंदू मानून काम करण्याचा संदेश आम्हाला आमचे दैवत आदरणीय शरद पवार साहेब व दशरथ दादा माने यांनी दिला आहे. आई, वडील हे आपले दैवत आहेत, त्यांची मनोभावे सेवा करा. तुमचे सर्व संसारोपयोगी साहित्य देवून लग्न लावून दिले आहे. मात्र बारश्यास मामा म्हणून बोलविण्यास विसरू नका असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथदादा माने, सीईओ विष्णूकुमार माने, संयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीणभैय्या माने, सोनाई परिवाराचे प्रमुख अतुल माने, किशोर माने यांनी केले. सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले.



चौकट : सामुदायिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती, सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे प्रवीणभैय्या माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदारकीचे तिकीट द्यावे अशी जाहीर मागणी यावेळी आपल्या भाषणातून महारुद्र पाटील यांनी केली.

---------------------------


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा