Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

नरसिंहपूर येथे नीरा नदीत गणेश विसर्जनाला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू तब्बल वीस तासानंतर मृतदेह सापडला


 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा नीरा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि.१७ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. अनिकेत कुलकर्णी (वय १६ वर्षे) असे मयत युवकाचे नाव आहे. तब्बल विस तासांच्या प्रदिर्घ शोधा नंतर मृतदेह सापडला असून शवविच्छेदनास पाठवण्यात आला आहे.

    तिर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह वेद पाठशाळेत गेली नऊ वर्षापासून वैदिक शिक्षण घेत असलेला अनिकेत विनायक कुलकर्णी (वय १६ वर्ष) याचा बुडून मृत्यू झाला. मंगळवार (दि.१७) रोजी दुपारी नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या समोरील डाव्या बाजूला नीरा नदीवरील लक्ष्मी घाटावर गणपती विसर्जन करण्यासाठी पाठशाळेतील व्यवस्थापकासह सर्व मुले  गेली होती. नदीच्या पाण्यात विसर्जन करायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे अनिकेत कुलकर्णी पाण्यात पडला. त्याला शोधण्यासाठी स्थानिक मुलांनीही नदीमध्ये उड्या घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही हाती लागले नाही. 

   त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला पाचारण करावे लागले. युद्धपातळीवर प्रशासकिय यंत्रणेने प्रयत्न केले. होडीतून व पाण्यात बुड्या घेऊन सदर मुलाचा शोध घेतला परंतु रात्र झाल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले. आज (दि.१८) रोजी सकाळी एनडीआरएफ जवानांना बोलावून मृत देहाचा शोध घेतला असता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. तब्बल वीस तासांच्या शोधकार्या नंतर मृतदेह सापडला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदापूर येथे पाठवण्यात आला. 

   घटनास्थळी इंदापूरचे तहसीलदार जिवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी दाखल होवून परस्थितीचा आढावा घेतला. सदर मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले. यावेळी महसूल, पोलीस व वैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुलाचे आई-वडील नातेवाईक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

फोटो - विसर्जनावेळी नदीत पडून बुडालेला अनिकेत विनायक कुलकर्णी.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा