*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रेमापोटी अपक्ष लढलो. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र करून कष्ट घेतले. खूप मोठी अपेक्षा होती. परिवर्तन विकास आघाडी १०० टक्के विजयी होईल, असा विश्वास होता. मात्र, हार जीत होत असते, लढलो हाच इतिहास आहे. 'हार कर भी जितनेवाले को बाजीगर कहते है।' जनतेने दिलेला कौल मान्य असून, यापुढे खचून न जाता अधिक जोमाने काम करून जनतेची सेवा केली जाईल, असा विश्वास परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण भैय्या माने यांनी व्यक्त केला.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर प्रवीण माने यांच्या निवासस्थानी उपस्थित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माने म्हणाले, हार-जीत होत असते. ज्यांनी मतदान दिले त्यांचे आभार मानतो. परिवर्तन विकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या मदतीला ठामपणे उभा राहणार. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून काम करेन. कोणी राजकारणात ताम्रपट घेऊन आलेल नसतं, खचून जाणार नाही.
इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती परिवर्तन विकास आघाडीचे नेते मयूरसिंह पाटील म्हणाले, तालुक्यात तिसरा पर्याय म्हणून नवखे असलेले प्रवीण माने यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींपुढे आव्हान उभे केले. आपल्या आघाडीकडे कोणताही पक्ष नव्हता, नेते नव्हते तरीदेखील चांगले मतदान किटली या चिन्हाला झाले. झालेल्या मतांची प्रेरणा घेऊन आघाडी पूर्ण ताकतीने काम करेल. प्रवीण माने हे उगवते व्यक्तिमत्त्व ठरले असून, तालुक्यातील नवीन इतिहासाचे पान त्यांनी लिहिले आहे. मतदारांनी अल्पकाळात उत्तम प्रतिसाद दिला. यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सर्व निवडणुका परिवर्तन विकास आघाडी सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली लढण्यासाठी कटिबद्ध राहील.
बाबासाहेब चवरे म्हणाले, तालुक्यात जातीपातीचे राजकारण करू नये. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आलेल्या परिवर्तन विकास आघाडीला जनतेने प्रवीण माने यांना पाठिंबा दिला. नवीन पिढीने जातीमुक्त राजकारणात सहभाग घ्यावा.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा