*प्रतिनिधी*
*प्रा.विश्वनाथ- पाटील*
*कोडोली ता-पन्हाळा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पतीच्या साथीने बिकट काळात मोठे समाजकार्य केले. कार्य करताना त्यांनी स्वतःचा फायदा कधीच पाहिला नाही. त्यांच्याप्रमाणे समाजातील सर्वांनी यथाशक्ती समाजकार्य करावे," असे प्रतिपादन वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे बी. एड. कॉलेजच्या प्रा. गीतांजली जोशी यांनी केले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ( बी. एड. कॉलेज ) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
यानिमित्ताने ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' या उपक्रमांतर्गत अवांतर ग्रंथाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले, " आज क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून आपण सामुदायिक ग्रंथवाचन घेतले. त्याचे कारणही तसेच आहे. आजच्या युवा पिढीचे अवांतर वाचन लुप्त झाले आहे. वाचल्याशिवाय आपणास सावित्रीबाई किंवा त्यांच्यासारख्या अन्य विभूती कशा समजतील ? सामुदायिक वाचनातून प्रेरणा घेवून सर्वांनी अवांतर वाचन केल्यास सावित्रीबाईंना ती खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्यासाठीच सामुदायिक वाचनाचा उपक्रम राबविला . "
कार्यक्रमास प्रा. एस. जी. जाधव, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, सेवक तानाजी मोहिते यांच्यासह विद्यार्थी - शिक्षक उपस्थित होते. सौरभ झेंडे यांनी सूत्रसंचालन व प्रास्तविक केले. प्रीती प्रभाकर रेवणकर यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा