*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
वेळापूर (ता.माळशिरस) येथील रामजी हरिश्चंद्र कश्यप याची १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय खो-खो संघात मुख्य ऑल राऊंडर प्लेअर म्हणून निवड झाली आहे.
रामजी कश्यप याने अकलूज येथील अकलाई विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतले.त्यानंतर ५ वी ते ११ वी पर्यंत वेळापूर येथील इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. येथेच त्याला खो-खो चे धडे मिळाले.घरची परिस्थिती हालाखीची असतानाही खो-खो मध्ये नाव कमवायचे या उद्देशानेच त्याने खो-खो खेळाचे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी मार्गदर्शक एन.एस. जाधव,शिवाजी जाधव,सतीश कदम,सोमनाथ बनसोडे,जावेद आतार व श्रीनाथ खटके यांची मोलाची साथ मिळाली.
२०१४ मध्ये त्याने प्रथम खो-खो च्या प्रवासाला सुरूवात केली.१४ वर्षाखालील गटामध्ये त्याने दोन वेळा गोल्ड मेडल मिळविले. त्यानंतर २०१७ मध्ये जिल्हास्तरीय,विभागस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर अनेकदा उत्कृष्ट कामगिरी करीत आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली.याच जोरावर २०२१ मध्ये त्याची महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.यावेळी त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत संघाला गोल्ड मेडल मिळवून दिले. २०२२ मध्ये सिनीयर नॅशनल खेळामध्ये द्वितीय स्थान पटकाविले. २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या सिनीयर नॅशनल खेळामध्येही महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवून संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला.२०२२ व २०२३ मध्ये अल्टीमेट खो-खो लिगमध्ये चेन्नई क्वीक गन्स संघाकडून निवड झाली.सलग २ वर्षे त्याला बेस्ट प्लेअरचा किताबही मिळाला.२०२४ मध्ये त्याच्या या कामगिरीबद्दल केंद्र सरकारने सेंट्रल रेल्वेमध्ये तिकिट निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.याही वर्षी त्याने इंडियन रेल्वेकडून चांगली कामगिरी करीत संघाला द्वितीय स्थान पटकावून दिले.इंटर रेल्वेच्या नॅशनल खो-खो स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंट म्हणूनही गौरविण्यात आले.२०१७ मध्ये विभागीय स्पर्धेमध्ये ७ मिनिट ३० सेकंद बचाव करण्याचा त्याच्या नावावर विक्रम झाला आहे.
त्याच्या या प्रवासाची दखल घेत १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये मुख्य ऑल राऊंडर प्लेअर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्याच्या या यशामध्ये मार्गदर्शक डॉ.चंद्रजीत जाधव,शरद होनखडे,इंडियन रेल्वचे प्रशिक्षक सुधीर मस्के,खा.धैर्यशील मोहिते-पाटील,वडील हरीश्चंद्र, आई कमला,भाऊ रामनारायण, अजय व बहिण अंजली यांची मोलाची साथ मिळाली.खा. धैर्यशील मोहिते-पाटील व आ.उत्तमराव जानकर यांच्यासह अनेकांनी त्याचे अभिनंदन केले.
*चौकट*
*परिश्रम व सातत्याने यश मिळतेच : रामजी कश्यप*
अनेकवेळा मला पराभवाचा सामना करावा लागला.परंतू मैदानावर असलेली निष्टा, परिश्रम आणि खो-खो खेळामधील सातत्याने मला आज भारतीय संघात स्थान मिळाले आहे.यामध्ये अनेकांचे मार्गदर्शन मिळाले आहे.माझी यशाची पायरी चढण्यासाठी अनेकांनी सर्वोतोपरी मला मदत केली.श्री अर्धनारी नटेश्वर क्रिडा मंडळाच्या माध्यमातून व खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शनामुळेच मी आज हे यश मिळवू शकलो.
रामजीच्या पाऊलावर पाऊल टाकीत आता भाऊ अजय ही खो-खो मध्ये आपले यश मिळवित आहे.त्यास खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचा खो-खो मधील भारतातील सर्वोत्कृष्ट 'भरत अवॉर्ड' ने सन्मानीत करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा