Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

*बीड येथील पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन केली आत्महत्या*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

बीड- बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर उडालेल्या धुरळ्याने बीडची प्रतिमा मलीन झालेली असतानाच चक्क पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयातच जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.


बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन पोलिसाने आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सकाळपर्यंत हा मृतदेह झाडालाच लटकलेल्या अवस्थेत होता. अनंत मारोती इंगळे (रा. कळंम आंबा, ता. केज, जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे अधिकारी बीड शहरात तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान आहे. याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करणार? हे पाहावे लागेल. अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा