कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
-----महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांची भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके मार्गदर्शक तत्वे २०२२ अन्वये मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यामध्ये बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राची आदर्श वाटचाल सुरू असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागप्रमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.
या प्रक्रियेअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या नेतृत्वा खाली युनिसेफ व आय.आय.टी. मुंबई यांच्या तज्ज्ञ विश्लेषकांची टीम तयार करण्यात आली. इंदापूर तालुक्यामध्ये या टीमचे नेतृत्व युनिसेफचे डॉ. कारभारी खरात, प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा, डॉ. प्रिती चामले-रेड्डी, अमोल पवार यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील बिजवडी, पळसदेव, शेटफळगडे, कळस, बावडा, काटी, निरवांगी, लासुर्णे, सणसर, शेळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे २५०० प्रश्र्नांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये इमारतीची पाहणी, अंतर्गत स्वच्छता, औषधांची मुबलक उपलब्धता, कार्यरत मनुष्यबळ, दफ्तर तपासणी, शासकीय योजनांची अंमल बजावणी, फायर ऑडिट, सौरऊर्जेचा वापर, बायोमेडिकल वेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी बाबी प्रामुख्याने तपासण्यात आल्या. यामध्ये बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राची गेल्या ३ वर्षा मध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे दिसून आले आहे.
लोकसंख्येच्या वाढत्या आरोग्यविषयक गरजा, नवीन आजारांचे वाढते प्रादुर्भाव, खाजगी वैद्यकीय सुविधांचे वाढलेले दर या सर्वांचा विचार करता तसेच राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्यामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मूल्यांकनाचा अहवाल व आढावा राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांना लवकरच देण्यात येणार आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवून नागपूर मधील १७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे सुशोभीकरण केले आहे. त्याच धर्तीवर बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आदर्श वाटचाल सुरू असून लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रा.आ. केंद्र बिजवडी येथील मानांकनानुसार केलेले कार्य पाहणी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सत्कार समारंभाचे निमंत्रण देणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचा आदर्श पॅटर्न तयार झाला असून जिल्ह्यात हे केंद्र पहिल्या पाच मध्ये आणण्यासाठी आम्ही सर्व जण कटिबद्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी यावेळी दिली.
बिजवडी प्राथमिक आरोग्य विभागास कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व विश्वस्त मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील या सर्वांचे चांगले सहकार्य लाभत आहे. त्यामुळे रुग्णांना जास्तीतजास्त आरोग्य सुविधा मिळत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी विविध आजारांच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षवेधी घट झाली आहे.
भिवंडी महापालिकेच्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्काराने दोनदा गौरविण्यात आलेले सहाय्यक संचालक डॉ. कारभारी खरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी संतोष बाबर, चंद्रकांत गोंजारी, सुरेश शिर्के तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, उपस्थित कर्मचारी यांनी या मूल्यांकन प्रक्रियेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. सुश्रुत शहा यांनी सर्वांचे शेवटी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा