*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल 8378081147*
होमिओपॅथीने टळल्या छोट्या मोठ्या हजारो शस्त्रक्रिया. सर्जिकल होमिओपॅथी, रुग्णांना वरदान !
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांची २७० वी जयंती १० एप्रिल २०२५ रोजी जगभर साजरी होत आहे. होमिओपॅथिक औषधांची उपयुक्तता मनुष्य, पशु पक्षी प्राणी तसेच शेती मध्ये देखील दिसून आली आहे. या २७० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत जगभर जेवढ्या महामारी आल्या, त्यामध्ये होमिओपॅथीने आपले भरीव योगदान दिले आहे. अखिल मनुष्य प्राण्यांबरोबरच होमिओपॅथी पशू पक्षी प्राणी तसेच शेती साठी देखील उपयुक्त ठरली असल्याने जनाधार वाढला आहे मात्र या चिकित्सा पद्धतीस राजाश्रय मिळणे ही काळाची गरज आहे. जगात औषध खपामध्ये होमिओपॅथी ही दुसऱ्या क्रमांकावर असून १७६ देशात रुग्ण बरे करण्यासाठी या शास्त्राचा प्रभावी वापर होत आहे. जे लोक या शास्त्रास प्लेसिबो थेरपी म्हणतात, ते देखील होमिओपॅथिक औषधांचे गुण पाहून आश्चर्यचकित होत आहेत. खरे तर होमिओपॅथी ही नॅनो तंत्रज्ञानाचा आविष्कार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या शास्त्रा कडे सकारात्मक होलिस्टिक दृष्टीने पहाणे गरजेचे आहे.
होमिओपॅथीचा शोध व गोल्डन प्रयोग:
आधुनिक चिकित्सा पद्धतीचे एम. डी. डॉक्टर ख्रिस्तीयन फ्रेडरिक सॅम्युएल हॅनेमान यांनी १७९० साली होमिओपॅथीचा शोध सारख्याने सारख्यास बरे करणे या निसर्ग तत्वाने लावला. डॉ. हॅनेमान यांचा जन्म १० एप्रिल १७५५ या दिवशी जर्मन मधील मिसेन या गावी झाला. १७७९ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी 'स्वावलंबी शिक्षण हेच आपले ब्रीद' या तत्वाने त्यांनी वैद्यकीय एम.डी.ची पदवी घेतली. सुमारे पाच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय केल्यानंतर प्रचलित औषधी पद्धतीवर ते नाराज झाले. १७८५ ते १७९० या काळांत वैद्यकीय व्यवसाय बंद करून त्यांचे मन आजार बरे करण्याच्या शाश्वत तत्वाचा शोध घेऊ लागले. १९९० मध्ये डॉ. कलन यांच्या औषधी ग्रंथाचा ते इंग्लिशमधून जर्मन भाषेत भाषांतर करीत असताना त्यांना सिन्कोना या औषधाचे गुणधर्म पटले नाहीत. 'सिंकोना' या औषधाची लक्षणे हिवतापाच्या लक्षणाशी जुळत आहेत असे त्यात म्हटले होते. या गुणधर्माचा पडताळा घेण्यासाठी त्यांनी स्वतःच सिंकोनाच्या सालीचा काढा घेतला असता त्यांना थंडी, ताप ही हिवतापाची लक्षणे त्यांनी स्वतःच अनुभवली तसेच हिवतापाच्या रुग्णाला हे औषध दिले असता ते खडखडीत बरे झाले. त्यामुळे या प्रयोगास होमिओपॅथी मध्ये गोल्डन प्रयोग म्हणून ओळखले जाते. येथूनच पुढे होमिओपॅथीचा शोध लागला. त्यामुळे डॉ. हॅनेमान यांना होमिओपॅथीचे जनक म्हणून ओळखले जाते.
१७९० साली सिंकोनाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांनी १७९६ साली होमिओपॅथीचा क्रांतीकारक शोध हुफ्फलँड जर्नल भाग दोन मधून जगासमोर मांडला. त्यानंतर त्यांनी आपली बायको, मुले, मित्र परिवार यांच्यावर विविध औषधांचे सिद्धीकरण करून औषधांची संख्या वाढवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली. आजमितीस विविध ताकदी मध्ये साडे चार हजारहून जास्त होमिओपॅथिक औषधांचे सिद्धीकरण जगभर झाले आहे.
मूलभूत तीन दोष :
जुन्या अमीत रोगाचे तत्त्व यावर सतत बारा वर्ष संशोधन केल्यानंतर डॉ. हॅनेमान यांनी तीन मूलभूत दोष आजारास कारणीभूत असल्याचे प्रतिपादन केले. ते तीन दोष पुढीलप्रमाणे आहेत.
(१) सोरा : या दोषात इंद्रिय विकृती पेक्षा कार्य बिघाड होतात.त्याकाळी सोरा हा शब्द खरुज, खाज, कुष्ठ दोष किंवा भेसळ या अर्थाने वापरला जात होता. सोरा ही सर्व आजारांची जननी आहे असे म्हणतात.
२) सायकोसीस : या गटात दमट, कुबट, नदी अथवा समुद्राकाठची हवा, तसेच जलयुक्त अन्न सहन न होणारे रोग होतात, शरीरावर चामखिळ्या किंवा मांसांकूर उगवतात.
३ ) सिफीलीस : या गटात गुप्त रोग झाल्या मुळे किंवा दबल्यामुळे होणारे आजार होतात. गरमी, परमा, बद वगैरे लैंगिक रोग या विकार दोषामुळे होतात. सन १९९५ पासून मृत्युचे थैमान घालून जग हादरून सोडलेला 'एडस' हा आजार समूह या विकार दोषाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करतो. या विकार दोषासाठी सम लक्षण चिकित्से प्रमाणे होमिओपॅथिक औषधोपचार केले तर रुग्णांची लक्षणे घटून त्यांच्या वजनात तसेच आयुर्मानात वाढ झालेली दिसून येते.
होमिओपॅथिक औषधे:
होमिओपॅथीक औषधांची प्राप्ती वनस्पती (कॅलेंडूला, बेलाडोना इत्यादी), खनिजे ( बोरॅक्स, ग्रॅफायटीस, ॲसेटीक ॲसिड इत्यादि ), प्राणीज गट (लॅकेसिस- सर्प विषापासून तयार केलेले औषध इत्यादि), नोसोडस ( रोगलसी पासून तयार केलेली औषधे) : लायसिन - पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेपासून तयार केलेले औषध, सारकोड्स ( जिवंत प्राण्याच्या शरीरातील ग्रंथीचे स्त्राव उदा. थायरॉईड पासून थायरॉईडीनम), इम्पांडेरेबिलिया (कृत्रीम धातूशक्तीची औषधे उदा. एक्स-रे इत्यादी) या सहा गटातून करतात.
भारतात होमिओपॅथी :
डॉ. हॅनेमान यांचे स्पॅनिश शिष्य डॉ. जॉन मार्टिन हनिंगबर्गर यांनी १८३९ साली पंजाबचे महाराज रणजितसिंग यांच्या लकव्यावर यशस्वी होमिओपॅथीक औषधोपचार करून केला. कलकत्ता कॉलरा साथीत त्यांनी औषधोपचार सुरू केल्याने त्यांना 'कॉलरा डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. १८४३ साली बाबू राजन दत्ता यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यावर यशस्वी औषधोपचार केले. सन १८५१ साली फ्रेंच ॲलोपॅथीक डॉक्टर टोनेरे यांनी जॉन हंटर लिटलर व बाबू राजन दत्ता यांच्या सहकार्याने प्रथम नेटीव्ह होमिओपॅथीक हॉस्पिटलची स्थापना कलकत्त्यात केली. १५ फेब्रुवारी १८६७ साली कलकत्ता विश्वविद्यालयाचे ॲलोपॅथीक एम. डी. डॉ. महेंद्रलाल सरकार यांना बाबू राजन दत्ता यांनी होमिओपॅथीची शिक्षा व दीक्षा दिली. ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांचेवर होमिओपॅथीक औषधोपचार करत असत. त्यांनी कलकत्यात तसेच पर्यायाने भारतात होमिओपॅथीक उपचार
पद्धतीला जनमान्यता मिळवून दिल्याने भारतात होमिओपॅथी लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. डॉ. पी. सी. मुजूमदार, डॉ. डी. एन. रॉय यांनी १८८१ मध्ये पहिले होमिओपॅथीक कॉलेज कलकत्यात स्थापन केले.
होमिओपॅथीची वैशिष्ट्ये :
होमिओपॅथी रोगाची चिकित्सा करीत नसून रोग्याची चिकित्सा करते. औषधाचे परीक्षण व संशोधन निरोगी परंतु विविध वयोगटाच्या मानवावर करता येते. यामुळे औषधाची मानसिक व शारीरिक लक्षणे समजतात. औषधे जितकी सूक्ष्म तितकी गुणात्मक प्रभावशाली असतात. औषधांचा शरीरावर कुठला ही घातक परिणाम होत नाही. औषधे शक्यतो जीभेवर चोखून खायची असतात. औषधे सुरू असताना चहा, कॉफी, पान, तंबाखू, सिगारेट, कच्चा कांदा, लसूण, मद्यपान इत्यादी गोष्टी टाळणे गरजेचे आहे. आजार कायमस्वरूपी बरे करण्यासाठी होमिओपॅथिक औषधांबरोबर संतुलीत आहार, दैनंदिन व्यायाम, योग प्राणायाम करणे गरजेचे आहे.
इतर कुठल्याही औषधां पेक्षा या शास्त्रातील औषधे स्वस्त असल्याने ती सर्वांना परवडतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती व प्रकृती तितक्या विकृती यावर शास्त्रीय दृष्टीकोनातून उपचारा साठी विकसित केलेल्या होमिओपॅथीचे जनक धाडसी संशोधक, थोर तत्त्ववेत्ते, रसायन शास्त्रज्ञ डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांची जीवनयात्रा २ जुलै १८४३ रोजी संपली.
जगास त्यांनी होमिओपॅथीची अनमोल देणगी दिल्याने जग नेहमी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहील.
महाराष्ट्रात होमिओपॅथीचा प्रसार :
होमिओपॅथीचा प्रसार प्रथम विदर्भ नंतर पुणे, कोल्हापूर व मुंबई येथे झाला. होमिओपथी व बाराक्षार चिकित्सा पद्धतीचा व्यवसाय करण्यासाठी डॉ. दफ्तरी यांनी नागपूर हायकोर्टा तून परवानगी मिळविली होती. राजर्षी शाहू महाराज यांनी होमिओपॅथीस राजाश्रय देऊन कोल्हापूर येथे होमिओपॅथिक दवाखाना सुरू केला होता.
डॉ. हॅनेमान यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना आवाहन :
होमिओपॅथीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात त्वरीत स्वतंत्र होमिओपथीक संचनालय स्थापन करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मूलभूत आरोग्य सेवा मिळण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना शासकीय सेवेत सामील करून घेऊन त्यांना इतर चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांप्रमाणे वेतन देणे गरजेचे आहे.
राज्यात ६८ हून जास्त होमिओपॅथिक कॉलेज किमान असून सदर कॉलेज मध्ये शंभर बेड चे होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे. दहा शहरात शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालये व संशोधन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. एडस्, कॅन्सर, दमा, संधिवात इत्यादी व तत्सम आजारावर संशोधन केंद्र उभारून त्याला पुरेसा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
होमिओपॅथिक महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या डॉक्टर्सना इंटर्नशीप कालावधीत शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्थानिक स्वराज संस्थांचे दवाखाने यांचा प्रशिक्षणासाठी वापर करण्यासाठी शासनाने अनुमती देणे गरजेचे आहे. सर्वांसाठी आरोग्य सन २००० या शासकीय धोरणाचा पुरेश्या डॉक्टर्स अभावी बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शासनाकडून इंटर्नशिप काळात डॉक्टरांना पुरेसे वेतन देणे गरजेचे आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पिसाळलेले कुत्रे चावणे, साप चावणे, धनुर्वात यावरील होमिओपॅथिक औषधे त्वरीत उपलब्ध करून त्याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. होमिओपॅथिक औषधे सर्वसामान्य रुग्णांना सहज परवडतात. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्वतंत्र होमिओपथिक औषधोपचार विभाग संपूर्ण ताकदीने सुरू करणे गरजेचे आहे. आयुष अंतर्गत नेमलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना योग्य वेतन देऊन त्यांना शासकीय नोकरीत कायम करणे गरजेचे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे त्या इंदापूर मध्ये आल्या असताना होमिओपॅथीच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य बजेट ची तरतूद करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे तरतूद होणे गरजेचे आहे. सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांचे विविध प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडविले पाहिजेत.
सर्जिकल होमिओपॅथी:
अती तातडीच्या शस्त्र क्रियेत रुग्णांची भीती घालविण्यासाठी तसेच जखमा भरण्यासाठी होमिओपॅथी उपयुक्त आहे. जिथे तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, तिथे ती करणे गरजेचे आहे मात्र जिथे वेळ आहे, तिथे होमिओपॅथिक औषधे उपयुक्त ठरतात याचा अनुभव गेली ३३ वर्षापासून हजारो छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया टाळून आम्ही घेतला असून आता सर्जिकल होमिओपॅथी या विषयावर मी पुस्तक लिहिण्यास घेतले आहे. माझे मोठे भाऊ डॉ. श्रेणिक शहा हे जनरल सर्जन आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया आम्ही वाचवू शकलो आहे. मूळव्याध, भगिंदर, कुरुपे, चामखीळ, किडनी स्टोन, पित्ताशयाचे खडे, मानेच्या तसेच कंबरेच्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, गर्भाशय मुखाच्या गाठी, चरबीच्या गाठी, विविध प्रकारचे कॅन्सर, फॉरेन बॉडी, स्तनाच्या गाठी, पोस्ट ऑपरेटिव्ह एडेजन, स्पायनल हेडेक, गँगरीन, अपेंडिक्स, थायरॉईड आदी विविध व्याधी होमिओपॅथिक औषधोपचाराने बरे होतात. त्यामुळे आता रुग्णांचा कल होमिओपॅथी कडे वाढला आहे. मात्र यामध्ये संशोधन आणि परीक्षण याला देखील वाव मिळणे गरजेचे आहे.
डॉ. संदेश शहा, इंदापूर जिल्हा पुणे.
डॉ. संदेश शहा हे आरोग्यसंदेश बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी चा सन २०२५-२६ चा डॉ. हॅनेमान जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा