*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
लवंग (ता.माळशिरस) गावाचा सुपुत्राने राज्यसेवेत झळकावले यश. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील एक छोटंसं गाव लवंग आहे.या गावातून सुरू झालेला खंडू लक्ष्मण पवळ यांचा प्रवास थेट राज्यसेवा २०२३ मधून नगरपरिषद मुख्याधिकारी (गट ब) या अत्यंत जबाबदारीच्या राजपत्रित पदापर्यंत पोहोचला आहे. हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान आहे.
सध्या खंडू पवळ हे दुय्यम निबंधक श्रेणी-1 या पदावर तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे कार्यरत असून नागपूर ग्रामीण विभागात प्रशासनाच्या माध्यमातून लोकसेवा बजावत आहेत. मात्र या यशामागे आहे सततचा अभ्यास,न थांबणारी जिद्द आणि गावगाड्याशी असलेली नाळ. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग,माध्यमिक शिक्षण हनुमान विद्यालय लवंग,उच्च माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले आहे.त्यानंतर स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर (जिल्हा सांगली) येथून एम-टेक मेकॅनिकल डिझाईनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली आहे.त्यांनी आठ वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालय इंदापूर येथे ज्ञानदानाचे कार्य केले. शिकवताना अनेक विद्यार्थ्यांना घडवले आणि आता स्वतःचं आयुष्यही घडविले आहे.
फक्त २ वर्षांच्या अभ्यासात त्यांनी राज्यसेवेतील सहा पदांवर यश मिळवले आहे.त्यामध्ये दुय्यम निबंधक,सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय),राज्य कर निरीक्षक,तलाठी,क्राफ्ट इन्स्ट्रक्टर आणि आता नगरपरिषद मुख्याधिकारी (गट ब) पदी निवड झाली आहे.
या यशाच्या शिड्या चढताना त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा" या प्रमाणे यश मिळवले आहे. त्यांनी संशोधनातही भरीव योगदान दिलं. "स्मार्ट फ्लुइड अॅप्लिकेशनस इन नॅनोटेक्नॉलॉजी" या पुस्तकाचे लेखक केले असून,अकरा आंतरराष्ट्रीय व सात राष्ट्रीय संशोधन लेख नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत.
सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख प्रशासन आणि संविधानप्रेरित मूल्यं यांची तळमळ त्यांच्या कामातून नेहमी दिसून आली आहे.वयाच्या ३१ व्या वर्षी सुरू झालेला संसार, जबाबदाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास आज पूर्णत्वास येत असताना,श्री. पवळ यांनी आपल्या कर्तुत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.
*चौकट*
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार,कुटुंबाचा आधार आणि मित्र परिवाराची साथ हेच त्यांच्या यशामागील खरे पाठबळ आहे.सततचा अभ्यास,संघर्ष आणि बघीतलेले स्वप्न यांची त्रिसूत्री अंगीकारली की,यश हा निव्वळ काळाचा खेळ ठरतो!
*खंडू लक्ष्मण पवळ*
(नूतन मुख्याधिकारी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा