*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
भारतीय हवामान विभागाने दिनांक 21 ते 24 मे दरम्यान दिलेल्या मुसळधार वादळी पावसाच्या अंदाजानुसार गेल्या दोन -चार दिवसात सोलापूर तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे. या झालेल्या पावसाने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाला असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी व डाळिंब बागा, ऊस शेती तसेच शेतीतील इतर पिके मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावे अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी केली.
अतुल खूपसे पाटील म्हणाले की, यंदाचा उन्हाळा म्हणावा तसा जाचक गेला नाही. याचे कारण म्हणजे पावसाने मान्सून पूर्व हजेरी लावली आहे. वास्तविक पाहता अवकाळी पाऊस थोडाफार शेतकऱ्यांनी सहन केला असता. मात्र
यावर्षी मान्सूनपूर्व झालेल्या प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतपिकांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा.
करमाळा, माढा, पंढरपूर तसेच सोलापूर भागातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने हेक्टरी 2 लाख रुपयांची मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अतुल खूपसे पाटील यांनी यावेळी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा