उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
आज-काल मोबाईल किंवा तंत्रज्ञान प्रधान युगात एक महत्त्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे मुलांमध्ये सहनशीलता अतिशय कमी दिसते . ही बाब चिंतेची आहे कारण सहनशीलता ही व्यक्तिमत्व विकासासाठी आणि समाजात मिळून मिसळून राहण्यासाठी आवश्यक गुण आहे.
वास्तविक पाहता सहनशीलता म्हणजे एखाद्या त्रासदायक किंवा अवघड परिस्थितीत शांतपणे राहण्याची व तणाव न घेता परिस्थिती स्वीकारण्याची क्षमता, विवेकशीलता दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता आणि आलेल्या अडचणींना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यावर मात करण्याची क्षमता सहनशीलतेमुळे येते. हल्ली हे गुण मुलांमध्ये कमी दिसतात लहान सहान गोष्टींवर मुले राग व्यक्त करतात, मतभेद सहन करत नाहीत अपयश पचवू शकत नाहीत हे आई वडील किंवा नातेवाईक मित्र कोणीही थोडे रागावले तरीही मुले रडतात नाराज होतात रुसतात. अपमान किंवा अपयश सहन करीत नाहीत. एकेकाळी संयम शिस्त आणि सहनशीलता हे बालपणाचे मूळ गुण समजले जात होते पण आज त्याचा अभाव सर्वत्र दिसून येतो व याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अति लाड करणे हवे ते बालकांना तात्काळ देणे यामुळे बालकांमध्ये नकार पचवण्याची मानसिकता राहत नाही काही मागितले तर लगेच मिळायला हवे ही मानसिकता तयार होते आणि पुढे जाऊन तशीच सवय बालकांना लागते अर्थात पाहिजे ते मिळालेच पाहिजे नाही मिळाले तर मुलांना असह्य होते. प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो हे शिकवणे आवश्यक आहे यामुळे मुले संयम आणि प्रतीक्षा शिकतात काही वेळा जाणीवपूर्वक पालकांनी मुलांची मागणी अमान्य करून ती वस्तू न दिल्यास मुलांमध्ये प्रतीक्षा करण्याची मानसिकता वाढते त्यामुळे पालकांनी मुलांना मागतील ती वस्तू न देता संयम बाळगण्यास कृतीतून शिकवावे. खरे तर सध्या मुले मोबाईल इंटरनेटमुळे मैदानी खेळ विसरलीच आहेत तासंतास मोबाईल घेऊन गेम खेळत राहणे मुलांना आवडते मोबाईल म्हणजे हे लहान थोरांना लागलेले एक व्यसनच आहे हे व्यसन एकदा लागले तर त्यातून बाहेर पडणे अवघड जाते . मोबाईलच्या अतिवापरामुळे मैदानी खेळापासून मुले परावृत्त होऊ लागली आहे दिवसभर चुकीच्या पद्धतीने बसून मोबाईल गेम खेळत राहणे यामुळे डोळ्यांचा त्रास वाढतो भूक मंदावते शरीरात चरबीचे प्रमाण वाढते व्यायाम कमी होतो व शरीर स्थूल होऊन जाडी वाढते . कष्ट घेण्याची श्रम करण्याची सवय मुलांमध्ये कमी होते, बैठे काम करत राहणे हळूहळू मुलांमध्ये सवयच बनून जाते मैदानी खेळामुळे शरीराची वाढ व व्यायाम चांगल्या पद्धतीने होतो, भूक वाढते पचनक्रिया चांगल्या पद्धतीने होते, शरीरात उत्साह संचारतो व शरीर तंदुरस्त निरोगी राहते. सांघिक खेळामुळे नेतृत्व करण्याची, खेळताना हार स्वीकारण्याची , नियम पाळण्याची सहकार्यांना जुळवून घेण्याची , एकमेकांना समजून घेण्याची , एकजुटीने राहण्याची भावना मुलांमध्ये निर्माण होते. मैदानी खेळ हे जीवन शिक्षणाचं मोठं साधनच आहे .
पालकांनी मुलांना योगासने ध्यानधारणा शिकवावे त्यामुळे मानसिक आरोग्य सदृढ होते, वेळोवेळी चांगली पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यावेत रामायण महाभारत संतांची चरित्रे देशभक्तांच्या प्रेरणादायी कथा यामधून सहनशील तिचे उदाहरणे मुले अनुभवतात व हे मुलांच्या मनात खोलवर विंबते आणि वाचनामुळे पुस्तकांविषयी गोडी निर्माण होऊन अभ्यासातही रुची निर्माण होते यासाठी पालकांनी स्वतः मुलांसमोर मोबाईल न घेता पुस्तक घेऊन वाचन केल्याने मुले आपोआप पुस्तकांकडे वळतात. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात मुलांमध्ये वाचनाची सवय किंवा आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी जवळपासच्या ग्रंथालयात घेऊन जावे यामुळे मुले वेगवेगळी पुस्तके पाहतात आणि पुस्तक उघडून त्या पुस्तकात काय काय लिहिले आहे किंवा असेल या उत्सुकतेने वाचनास सुरुवात करतात परिणामी वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण होते मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळ ,वाचनालय हे उत्तम पर्याय आहेत ते पालकांनी मुलांसोबत अंगीकारले पाहिजे तरच मोबाईल पासून मुलांना थोडे दूर ठेवण्यात पालक यशस्वी होतील.
मोबाईल गेम्स खेळत राहिल्यामुळे मुले एकलकोंडी होतात स्वतःचे विश्व बनवतात व बाहेर काय चाललं आहे याच्याशी काही आपल्यास देणंघेणं नाही असे वागतात. भुख मंदावते व चिडचिडेपणा यामुळे वाढीस लागतो.
मुळात सहनशीलता म्हणजे कमकुवतपणा नाही ते म्हणजे धैर्य शांती आणि समजूतदारपणा आजच्या धकाधकीच्या जगात मुले बाहेरून जरी स्मार्ट आणि आत्मविश्वासी वाटत असली तरी त्यांना अंतर्गत बळ आणि भावनिक स्थैर्याची गरज आहे आणि त्यासाठी सहनशीलता हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे आपण सर्वांनी मिळून ही गुणवत्ता पुढच्या पिढीमध्ये रुजवली तरच समाज सशक्त समंजस आणि संतुलित होईल. मोबाईल हे एक उपयुक्त साधन आहे पण त्याचा अतिरेकी वापर मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो म्हणून पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे मोबाईलच्या व्यसनापासून लहान मुलांचे संरक्षण करणे ही आजच्या काळातील एक मोठी जबाबदारी आहे योग्य मार्गदर्शन वेळेचे व्यवस्थापन आणि प्रेमळ शिस्त या माध्यमातून आपण मुलांना या व्यसनापासून दूर ठेवू शकतो आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी योग्य दिशा दाखवू शकतो.
लेखिका-- नूरजहाँ शेख
गणेशगाव ता. माळशिरस





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा