*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
Sangli Municipal Corporation Bribe Case : महापालिका क्षेत्रात २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपायुक्त वैभव विजय साबळे (३१, रा. फ्लॅट क्रमांक ४०३, ग्रीन एकर्स धामणी रस्ता, मूळ रा. सातारा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. सोमवारी दुपारी झालेल्या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सांगलीत प्रथमच कारवाई झाल्याने खळबळ उडाली. उपायुक्त साबळे याच्या घराची सायंकाळी उशिरापर्यंत झडती सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली विभागाने ही कारवाई केली असून, साबळे याला अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत १७ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २५ फेब्रुवारीला पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे याने केल्याने सोमवारी कारवाई केली आहे. साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, साबळे याला पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा त्याच्या सांगलीतील घराची झडती घेण्यात आली. काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन उपअधीक्षक अनिल कटके, तत्कालीन उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांचा कारवाईत सहभाग होता.
कारवाईसाठी नवे उपअधीक्षक
तत्कालीन उपअधीक्षक उमेश पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल झाला होता. त्यांनी तक्रारीची पडताळणी पूर्ण केली. त्यानंतर चार दिवसांपूर्वी उमेश पाटील यांची बदली झाली. त्यांच्या जागी उपअधीक्षक अनिल कटके यांची नियुक्त करण्यात आली. गुरुवारीच त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पुन्हा या प्रकरणात त्यांनी पडताळणी केली आणि आज थेट कारवाई केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप
साबळे याच्याविरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नावही त्यात दिले होते. त्यानुसार त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचीही पडताळणी केली. मात्र, त्यात कोणतेही तथ्य दिसून आलेले नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
कारवाईनंतर इस्लामपुरात जल्लोष
उपायुक्त वैभव साबळे हा इस्लामपूर येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्याची सांगली पालिकेत उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. सोमवारी कारवाई झाल्यानंतर पालिकेच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. यापूर्वी पालिकेच्या मानधनावरील कर्मचारी लाच घेताना सापडल्यानंतर फटाके फोडले होते. त्यानंतर साबळे याच्यावर कारवाई झाल्यानंतरही फटाके फोडण्यात आले.
साताऱ्यातील घरावरही छापे
उपायुक्त वैभव साबळे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. सोमवारी कारवाई झाल्यानंतर सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले. सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मूळ घराचीही झडती घेण्यात आली आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही समजते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा