Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ जून, २०२५

*समृध्दी महामार्गात १५हजार कोटींचा भ्रष्टाचार --काँग्रेस पक्षाचा आरोप--श्वेतपत्रिका करण्याची मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मुंबई : राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग ७० हजार कोटी रुपयांवर गेला. प्रकल्पाचा खर्च १५ हजार कोटी रुपयांनी फुगवला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी केला.

तसेच सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सपकाळ यांनी समृद्धी महामार्गाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घोडबंदर- भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्तकांनी यातून मोठा मलिदा खाल्ला आहे. समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच '५० खोके एकदम ओके'चा कार्यक्रम झाला, अशी टीका सपकाळ यांनी केली.

'लेखाजोखा मांडा'

समृद्धी महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरचा किती खर्च झाला, भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती पैसे दिले, झाडे लावण्यास किती खर्च केला आणि पथकरातून किती वसुली सुरू आहे, याचा लेखाजोखा जनतेसमोर येण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा