*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
*आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांची होणार राहण्याची सुविधा
*चंद्रभागा नदीपात्र स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार
*लोकसहभागातून पंढरपूर शहरात राबविण्यात येणार स्वच्छता अभियान
सोलापूर/पंढरपूर, दिनांक 6:-आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. तसेच या काळात पालखी सोहळ्या व्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात, अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनाने तयारी करावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र कायम स्वच्छ राहील यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसेच वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. वारकरी भाविकांना उपलब्ध सुविधा तसेच सूचनांची माहिती देण्याचे फलक किमान 15 फूट उंचीचे लावावेत. नदीपात्रातील होड्यांची नोंद घेऊन होडी मालक व चालक यांचे नाव, आसन क्षमता निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच होडीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था ठेवली पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले.
तसेच शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण व रोलिंग करावे. पालखी मार्ग, तळ तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधून संयुक्तपणे कार्यवाही करावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पालखी मार्ग तसेच शहरातील रस्त्यावर बंद पडलेली वाहने तात्काळ काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी. वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी, अशाही सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. तसेच या वारी कालावधीत मानाच्या पालख्यासह अन्य पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा