*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- इंदापूर तालुक्यात पावसाने दिड महिन्यापासून ओढ दिल्याने शेतातील उसाच्या लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतातील इतर कामे ठप्प झाले असल्याने गावोगावच्या मजूरांच्या हाताला कामे नसल्याने बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर तरकारी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने तरकारी महागली आहे. तसेच चारा पिकांच्या संभाव्य उपलब्धतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर औषधे, बि-बियाणांच्या दुकानात माल भरून शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.
पावसाळ्याला सुरूवात होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला असून बावडा, नरसिंहपूर परीसरात दिड महिन्यापासून पाऊसाने दांडी मारली आहे. उजनी धरण क्षेत्रात व परीसरात समाधानकारक पाऊस झाला असून धरणातील पाणी साठा हळूहळू शंभरीकडे वाटचाल करीत आहे. उजनी धरणाने प्रथमताच जुलै महिन्यात शंभरी गाठल्याने भिमा नदीवरील माढा व इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजनांचा प्रश्न निकाली निघाला आहे.
नीरा नदीचे पात्र मागील दोन ते अडीच महिन्यापासून खळखळून वाहत असल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतीला प्रथमताच चांगले दिवस आले आहेत. शेतातील उभी पिके कडक उन्हाळ्यात अर्धी निमी जळून गेली. परंतू पावसाच्या पाण्यावर पिके तरल्याने शेतकरी राजा आर्थिक नुकसान होण्यापासून वाचला आहे.
पावसाने अडीच महिन्यापासून ओढ दिल्याने दाळी, मटन, चिकन, भाजीपाला काही अंशी महागला आहे. तर शेतातील कामे ठप्प झाल्याने शेतमजूरांच्या हाताला कामे नसल्याने मोठी आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे बाजारपेठेत माल आहे परंतू खरेदीसाठी पैसा नसल्याने कोणी फिरकायला तयार नसल्याने बाजारपेठा ग्राहकांन अभावी ओस पडल्या आहेत.
शेतकऱ्यांनी पावसाच्या जिवावर ऊसाची लागवड करण्यासाठी शेत नांगरून, खांदून, ओढून, सऱ्या सोडून ठेवल्या आहेत. पाऊस पडल्याबरोबर ऊस बेणे आणून लागण दाबायची एवढेच काम शिल्लक ठेवले आहे. परंतू पावसाच्या प्रतीक्षेत शेती मोकळी ठेवण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे. जर का अशीच परिस्थिती राहीली तर मात्र दुष्काळ पडण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चौकट - सध्याला पावसाने ओढ दिली असल्याने शेतकरी, शेतमजूर, दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन, व्यापारी, नागरीक, चिकन व मटन दुकानदार हातघाईवर आला आहे. बाजारपेठच थंड पडल्याने पैसा फिरायला तयार नाही. त्यातच नीरा व भिमा नद्यांना पाणी असूनही मोटारी बाहेर काढून ठेवल्याने पिकांना पाणीही देता येईना व पाऊसही पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे.
फोटो -१) गणेशवाडी येथे दुकानात खते, बि-बियाणे भरून शेतकऱ्यांची प्रतिक्षा करताना दुकानदार दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा